श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट फायनान्स कंपनीच्या माध्यमातून लाखो लोकांकडून कोटय़वधी रुपये गोळा करून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या समीर व पल्लवी जोशी या जोडप्याला काल मध्यरात्री अकोला रामदासपेठ पोलिसांनी नागपूर येथून अकोल्यात नेले. अकोला रामदासपेठ पोलीस ठाण्यात ३ डिसेंबरला फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. आजवर येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार अकोल्यात किमान २५ ते ३० गुंतवणूकदारांची कोटय़वधीची फसवणूक या जोडप्याने केली आहे.
यातील एक तक्रारदार मधुकर ददगाळ यांनी श्रीसूर्या कं पनीत ३० लाख रुपयांची गुंतवणूक केल्याचे स्पष्ट झाले. ददगाळ यांनी अकोला रामदासपेठ पोलिसांना तशी तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी समीर जोशी, पल्लवी जोशी, मोहन मुकुंद पितळे, मंगेश मोहन पितळे, मुकुंद पितळे, शंतनु कुऱ्हेकर, चंद्रशेखर कुऱ्हेकर व आनंद जहागिरदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. समीर व पल्लवी जोशी या दोघांविरुद्ध नागपूरच्या राणाप्रतापनगर पोलीस ठाण्यात १४ सप्टेंबरला गुन्हा नोंदविण्यात आला. त्यानंतर ३० ऑक्टोबरला अमरावतीच्या राजापेठ पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. दोन्ही ठिकाणी या दांपत्याची चौकशी झाल्यानंतर त्यांची नागपूर तुरंगात रवानगी करण्यात आली. दरम्यान, अकोल्यात गुन्हा दाखल केल्यानंतर रामदासपेठ पोलिसांनी त्या दोघांना ताब्यात घेण्यासाठी सर्व कायदेशीर तरतुदी पूर्ण करून काल मध्यरात्री समीर व पल्लवी जोशी यांना अकोल्यात नेले. अकोला खदान पोलीस ठाण्यात यांच्याविरुद्ध फसवणुकीचे गुन्हे असल्याने खदान पोलिसांनीही त्यांना ताब्यात घेण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
या दोघांच्या चौकशीतून आणखी काय बाहेर येते, याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. आता तक्रारदारांची संख्या वाढेल, असे मानले जात आहे. अजूनही फसवणूक झालेल्या बऱ्याच गुंतवणूकदारांनी पोलीस ठाण्यात तक्रारी केलेल्या नाहीत.
जोशी दांपत्याला १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडी
समीर व पल्लवी जोशी या दांपत्याने महाराष्ट्रात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केली असून त्यांचे ५८ कोटी रुपये देणे लागतात, अशी माहिती अकोला पोलिसांनी आज दिली असून, अकोला येथील न्यायालयात त्यांना हजर केले असता १८ डिसेंबपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत, अशी माहिती अकोला रामदासपेठचे ठाणेदार विलास पाटील यांनी दिली आहे.
नागपूरमध्ये ४ हजारावर, अमरावतीत १ हजारावर, तर अकोल्यात पाचशेवर गुंतवणूकदार आहेत, अशी कबुली या जोडप्याने पोलिसांना दिली आहे, असेही ते म्हणाले. श्रीसूर्या इन्व्हेस्टमेंट कंपनीच्या मालमत्तेची माहिती देताना ते म्हणाले की, या दांपत्याने चंद्रपूरमध्ये एक दुधाची फॅक्टरी व बेकरी पुरवठा करणारा कारखाना सुद्धा सुरू केला होता. शिवाय, नागपूर, गोवा, मुंबईसह अनेक ठिकाणी अनेक सदनिका व भूखंड घेतले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात त्यांच्या कंपनीचे ७२ एजंट होते व गुंतवणूकदारांनी केलेल्या गुंतवणुकीमधून त्यांनी ५० बसेस खरेदी केल्या आहेत, अशीही माहिती पाटील यांनी सांगितले.

Story img Loader