हार्बर मार्गावरील सीएसटी ते बेलापूर लोकलमध्ये बुधवारी मोटरमनच्या केबिनमध्ये मोटरमनच्या मद्यप्राशन करण्याच्या प्रकाराने प्रवाशांमध्ये मोठा गोंधळ उडाला. बेलापूर स्थानकात रात्री ८ च्या सुमारास हा प्रकार घडला असून प्रवाशांमध्ये याबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
सीएसटी ते बेलापूर ही लोकल सुरू असताना लोकलच्या मोटारमनच्या केबिनमध्ये बसून एक जण मद्यप्राशन करीत असल्याचे दृश्य मोटारमनच्या केबिनजवळील डब्यात बसलेल्या काही प्रवाशांच्या निदर्शनास आले. मद्यप्राशन करून मोटरमन लोकल चालवत आहे, असा प्रवाशांना संशय आला. त्यामुळे त्यांच्यात घबराट निर्माण झाली. त्यांनी भीतीने आरडाओरड सुरू केली. रात्री ८ वाजण्याच्या दरम्यान ही लोकल बेलापूर स्थानकात थांबल्यावर प्रवाशांनी रुद्रावतार धारण केला आणि मोटरमनच्या केबिनला घेराव घातला. या गोंधळात पुन्हा सीएसटीला जाणारी लोकला काही मिनिटांसाठी थांबविण्यात आली. प्रवाशांचा संताप पाहून पोलीस तेथे धावून आले. प्रवाशांनी झालेला हा प्रकार पोलिसांना सांगितल्यावर केबिनमध्ये बसलेले मोटरमन राजेंद्रकुमार संभाजी रासम (५२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी मोटरमनच्या केबिनची तपासणी केली असता रासम हे केबिनमध्ये दारू पीत असल्याचे त्यांच्याजवळ सापडलेल्या दारूच्या बाटलीमुळे निष्पन्न झाले.
प्रवाशांनी केलेल्या तक्रारीमुळे रासम यांना पनवेल लोहमार्ग पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. पोलिसांनी चौकशी केल्यावर रासम हे काम संपवून कामोठे येथील आपल्या घरी परतत होते, त्यावेळी त्यांच्याकडून हा प्रकार घडला असल्याचे निदर्शनास आले. रासम हे दारू पिऊन लोकल चालवीत असल्याची प्रवाशांची तक्रार होती. परंतु पोलिसांच्या तपासात त्यावेळी संबंधित लोकल मोटरमन कपील हे चालवीत होते असे निष्पन्न झाल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रकाश किर्दत यांनी दिली. रासम यांच्या रक्ताचे नमुने कालिना येथील न्यायवैद्यक प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा