चार वर्षांंपासून हज यात्रेसाठी जायची तयारी करणाऱ्या एका ५८ वर्षांच्या महिलेची दोन दिवसांपासून लगबग सुरू होती. ८ ऑक्टोबरला हजला जाणारे विमान असल्याने सर्व नातेवाइकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. पण सारे काही ‘खड्डया’त गेले. कारण जहांगीर कॉलनीतील एका खड्डयात त्यांचा पाय गेला. तोल जाऊन पडल्याने त्यांच्या डाव्या हाताचे हाड मोडले. केवळ शहरातील मोठय़ा खड्डयांमुळे झालेल्या या अपघातामुळे परिसरात महापालिका प्रशासनावरील रोष वाढला आहे. साफिया सुलताना असे या महिलेचे नाव असून खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मंगळवारी सायंकाळी हा प्रकार घडला. साफिया सुलताना यांना दोन मुले असून एक रिक्षा चालवितो, तर दुसऱ्या मुलाचे सायकल पंक्चर काढण्याचे दुकान आहे. घरची आíथक स्थिती बेताचीच. हजला जाण्याची इच्छा एवढी की, दरवर्षी आपल्याला यात्रेला जायला मिळावे, या साठी त्या दुआ करीत. या वर्षी हज यात्रेकरूंच्या यादीत नाव पाहिले तेव्हा त्यांना मोठा आनंद झाला. ८ ऑक्टोबरला विमानाने त्या रवाना होणार होत्या. तयारीसाठी त्या बाहेर गेल्या. पण या भागात खड्डेच खड्डे. सामान घेऊन येताना पाय मुरगळला आणि त्या तोल जाऊन पडल्या. काहीजणांनी उचलून घाटी रुग्णालयात दाखल केले. पण तेथे लवकर शस्त्रक्रिया होणार नाही, असे कळविले गेले. परिणामी खासगी रुग्णालयात न्यावे लागले. बुधवारी त्यांच्या हाताची शस्त्रक्रिया झाली. खड्डयांमुळे झालेल्या या अपघातामुळे हज यात्रेला जाता येणार नसल्याचे त्यांच्या नातेवाईकांनी सांगितले.