महापालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला असला तरी प्रत्येक उमेदवाराला आता स्वत:ची भ्रांत पडली आहे. घरकुल गैरव्यवहार प्रकरण बरेच गाजले. पण, त्यात जवळपास सर्वच अडकलेले असल्याने त्यावर सहसा कोणी बोलताना दिसत नाही. २००८ च्या महापालिका निवडणुकीत ज्यांनी भ्रष्टाचार, लाचखोरीचा बंदोबस्त करण्यासाठी मते मागितली, तेच आता तुरुंगात गेल्याने मतदार मात्र संभ्रमात आहेत.
माजीमंत्री सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील खांदेश विकास आघाडीची सूत्रे यावेळी त्यांचे भाऊ रमेश जैन यांच्या हाती आहेत. याच आघाडीचे सर्वात जास्त उमेदवार रिंगणात आहेत व इतर सर्व पक्ष याच आघाडीच्या विरुद्ध लढत आहेत. इतर साऱ्यांनी एकत्र येऊन जैन यांच्या आघाडीशी टक्कर देण्याचा प्रयत्न केला. पण, अतिमहत्वाकांक्षेपोटी तसे शक्य झाले नाही. परिणामी, खांदेश विकास आघाडीच यावेळी वरचढ ठरण्याची चिन्हे आहेत. खांदेश विकास आघाडीने अर्थात जळगाव नगरीचे शिल्पकार म्हणविणाऱ्या जैन यांनी गतवेळी महापालिका निवडणूक लढताना जाहीरनामा प्रसिद्ध केला होता. भ्रष्टाचार व लाचखोरीचा बंदोबस्त करण्यासाठी खांदेश विकास आघाडीला मते देण्याचे आवाहन त्यांनी केले होते. भ्रष्टाचारमुक्त प्रशासनाचे आश्वासन त्यांनी दिले होते. तथापि, गेल्या दोन वर्षांत शहरातील वेगवान घडामोडी पाहता सुरेश जैन यांच्यासह त्यांचे प्रमुख सहकारी व सारा गटच भ्रष्टाचार, अपहाराच्या प्रकरणात फसल्याचे दिसून येते. स्वत: जैन हे गेल्या दीड वर्षांपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.
सुंदर, सुबक व समृद्ध शहरासाठी, निरामय, सुखकर व शांततामय जीवनासाठी, विकासशील व प्रगत शहरासाठी, वेळेवर पाणी, परिसरातील स्वच्छता व नागरी सोईसुविधेसाठी, सर्व जाती-धर्मांना घेऊन चालण्यासाठी, झोपडपट्टीविरहित शहर व गरिबांना मोफत घरकुलांसाठी, जळगावला देशातील अव्वल शहर करण्यासाठी, गुंडशाही रोखणे व भ्रष्टाचाराचा बंदोबस्त करण्याची आश्वासने जैन यांनी जाहिरनाम्यात देताना ‘जे बोलणार तेच करणार’ असे ठामपणे म्हटले होते. उपरोक्त जाहिरनाम्यातील कोणत्या आश्वासनांची पूर्तता झाली ते शहरात फेरफटका मारल्यावर लक्षात येते. भ्रष्टाचाराचा बंदोबस्त करण्याची भाषा करणारे स्वत: त्यात अडकल्याचे प्रकर्षांने दिसून येते. सध्या प्रचार शिगेला पोहोचला असला तरी कोणी या विषयावर बोलण्यास उत्सुक नाही. पक्षीय उमेदवारांना स्वत: निवडून येण्याची काळजी पडल्याने ते इतरांकडे पहावयास तयार नाही, असे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.
प्रचारात घरकुल विषयावर सर्वच शांत
महापालिका निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला असला तरी प्रत्येक उमेदवाराला आता स्वत:ची भ्रांत पडली आहे. घरकुल गैरव्यवहार प्रकरण बरेच गाजले. पण, त्यात
First published on: 24-08-2013 at 08:53 IST
मराठीतील सर्व नाशिक वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All are become quite on gharkul project