या वर्षीपासून देशभरातील सर्व बोर्डाचे बारावीचे निकाल पाच जूनपूर्वी जाहीर करण्यात येणार असून त्याबाबतच्या कार्यवाही संबंधी राज्यातील सर्व बोर्डाच्या अध्यक्षांची मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बैठक बोलावली आहे. या वर्षीपासून देशभरात वैद्यकीय आणि आभियांत्रिकी प्रवेशासाठी एकच प्रवेश परीक्षा घेण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अभियांत्रिकीच्या प्रवेशासाठी बारावीच्या गुणांनाही महत्त्व देण्यात येणार आहे. मात्र, देशामध्ये विविध बोर्ड बारावीची परीक्षा घेतात. प्रत्येक बोर्डाचे परीक्षेचे आणि निकालाचे वेळापत्रक वेगळे असल्यामुळे एकाच प्रवेश परीक्षेनुसार प्रवेश प्रक्रिया राबवण्यामध्ये ते अडचणीचे ठरणार होते. त्यामुळे सर्व बोर्डाचे निकाल ५ जूनपूर्वी लावण्याचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाने निर्णय घेतला आहे. काही राज्ये या वर्षीपासून या निर्णयाची अंमलबजावणी करत आहेत, तर काही राज्यांनी पुढील वर्षीपासून एकच प्रवेश परीक्षा ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही या वर्षीपासूनच ५ जूनपूर्वी निकाल लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याबाबत देशातील सर्व बोर्डाच्या अध्यक्षांची मनुष्यबळ विकास मंत्रालयाने बैठक आयोजित केली आहे.

Story img Loader