असे कोणतेही क्षेत्र नाही जिथे रचनाकाराला जागा नसते. मोबाइल तयार करण्यापासून ते पेन तयार करण्यापर्यंत प्रत्येक ठिकाणी रचनाकार महत्त्वाचा ठरतो. पण या विषयातील शास्त्रशुद्ध प्रशिक्षण देण्यासाठी देशात फारच कमी संस्था आहेत. यामध्ये आयआयटी मुंबईतील इंडस्ट्रिअल डिझाइन सेंटर (आयडीसी)मध्ये येत्या शैक्षणिक वर्षांपासून डिझायनिंगमधील पदवी शिक्षण सुरू होणार आहे. या शिक्षणाची दारे सर्व शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी खुली असणार आहेत.
आयडीसी या संस्थेत यापूर्वी पदव्युत्तर शिक्षणापासून ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण दिले जात होते. या संस्थेने काळाची गरज लक्षात घेऊन या क्षेत्रातील पदवी शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतला. देशाचे अर्थशास्त्र हे ज्ञानाकडून कल्पकतेकडे जात आहे. डिझाइनच्या क्षेत्रात कौशल्यपूर्ण मनुष्यबळाची खूप कमी जाणवते. यामुळे या विषयात पदवी शिक्षण सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे आयडीसीचे प्रमुख प्रा. बी. के. चक्रवर्ती यांनी स्पष्ट केले. हा चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम असणार आहे. या पदवी अभ्यासक्रमाबरोबरच इंटिग्रेटड अभ्यासक्रमही करता येणार आहे. यामध्ये पाच वर्षांमध्ये डिझाइन क्षेत्रात पदव्युत्तर पदवी शिक्षणही पूर्ण करता येणार आहे. या अभ्यासक्रमासाठी बारावी उत्तीर्ण कोणताही विद्यार्थी पात्र ठरू शकतो. याचबरोबर तीन वर्षांची अभियांत्रिकी पदविकाधारकही या अभ्यासक्रमाला पात्र ठरू शकतात. मात्र विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा उत्तीर्ण करणे क्रमप्राप्त ठरणार आहे. या अभ्यासक्रमाच्या आणि प्रवेश परीक्षेच्या माहितीसाठी www.uceed.in या संकेतस्थळावर भेट द्यावी.
महत्त्वाच्या तारखा
*  १० ते २५ एप्रिल- ऑनलाइन नोंदणी
* ३१ मे – प्रवेश परीक्षा
* १० जून – प्रवेश परीक्षेचा निकाल
* जुलै २०१५ – अभ्यासक्रमास सुरुवात

Story img Loader