कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लेलवार व डॉ. करपे अद्याप फरार
नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा करणारे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडोपंत मल्लेलवार व डॉ. रवींद्र करपे फरार असून पोलिस दल त्यांचा शोध घेत असतांना स्थानिक कॉंग्रेस नेते मात्र चिडीचूप झाले आहेत. माध्यमांनी या प्रकरणी जिल्ह्य़ातील कॉंग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता जिल्हाध्यक्ष हसन गिलानी यांच्यासह सर्वानीच प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्याकडे बोट दाखविले.
गडचिरोली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बंडोपंत मल्लेलवार व डॉ. रवींद्र करपे यांच्यासह सहा जणांविरुध्द गडचिरोली पोलिसांनी नक्षलवाद्यांना शस्त्र व औषध पुरवठा केल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रुग्णवाहिकेतून नक्षलवाद्यांना नियमित शस्त्र पुरवठा केला जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. या देशविघातक कृत्यामुळे कॉंग्रेस नेते मल्लेलवार पुरते अडचणीत सापडले आहेत. त्यामुळे गडचिरोली व चंद्रपूर या जुळ्या जिल्ह्य़ातील कॉंग्रेस नेत्यांची अडचण झाली आहे. माध्यमांनी जिल्ह्य़ातील कॉंग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता सर्व नेते चिडीचूप आहेत. बंडोपंत मल्लेलवार सुरुवातीपासून कांॅग्रेस पक्षात सक्रीय आहेत. आता त्यांचे पक्षातील सहकारी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना याबाबत विचारले असता नो कॉमेंट, असे म्हणून या विषयाला ते बगल देत आहेत. गडचिरोली जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष हसन गिलानी यांची प्रतिक्रिया माध्यमांनी जाणून घेतली असता त्यांनी याबाबत प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनाच काय ते विचारा, असे उत्तर दिले.
ॉछत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी सुरूंग स्फोट घडवून २९ कॉंग्रेस नेत्यांचा बळी घेतला. या घटनेमुळे कॉंग्रेसचे वर्तुळ व स्वत: सोनिया गांधी व राहुल गांधी अस्वस्थ झाले असतांना आता त्यांच्याच पक्षाच्या नेत्याकडून नक्षलवाद्यांना शस्त्र पुरवठा होत आहे. हा प्रकार अतिशय निंदनीय असल्याचे कांॅग्रेस नेते एकांतात बोलत असले तरी कृपया प्रतिक्रिया प्रकाशित करू नका, असेही सांगत आहेत. केवळ जिल्हाध्यक्षच नाही, तर कॉंग्रेसचे आमदार डॉ. नामदेव उसेंडी व आरमोरीचे आमदार आनंदराव गेडाम या वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांनीही यावर अजून प्रतिक्रिया दिलेली नाही. गडचिरोलीचे खासदार मारोतराव कोवासेही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. गडचिरोली जिल्ह्य़ातील कॉंग्रेसचा साधा कार्यकर्ता या विषयावर साधी प्रतिक्रिया देण्यास तयार नाही. स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी साधलेल्या या चुप्पीतच बरेच काही दडले असल्याचे आता पोलिस अधिकारी सांगत आहेत.
मल्लेलवार यांचा हा उद्योग गेल्या अनेक वषार्ंपासून सुरू आहे. यापूर्वी सुध्दा त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे, तर अवघ्या आठवडाभरापूर्वी सावली येथील मल्लेलवार यांच्या तेंदूपत्ता गोदामावर चंद्रपूर व गडचिरोली पोलिसांनी संयुक्तपणे छापा टाकला तेव्हा पोलिसांना काहीही मिळाले नाही. मात्र, लगेच दुसऱ्या आठवडय़ात मल्लेलवारांचे नाव शस्त्र पुरवठय़ात समोर आल्याने आता कॉंग्रेस पक्ष पुरता अडचणीत सापडला आहे. त्यामुळेच स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी चुप्पी साधली आहे. केवळ गडचिरोलीच नाही, तर चंद्रपूर जिल्ह्य़ातील नेतेही या प्रकरणी काहीही प्रतिक्रिया देण्यास तयार नाहीत. याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपर्क होऊ शकला नाही. मल्लेलवार प्रकरणामुळे स्थानिक कॉंग्रेस नेत्यांची अडचण झाली आहे. आता पोलिस अधिकारी स्थानिक कॉंग्रेस नेत्यांना गाठून मल्लेलवार यांच्याबद्दल माहिती जाणून घेत असतांना ते अतिशय साधव पवित्रा घेत असल्याची माहिती पोलिस दलातील सूत्रांनी दिली.

Story img Loader