जमीन महसुलाच्या थकबाकी वसुलीसाठी तालुक्यातील सर्व ९१ ग्रामंपचायतीची बँक खाती महसूल विभागाने आज गोठवली. ऐन मार्चअखेरीस परिविक्षाधीन अधिकारी दिपा मुधोळ यांनी ही कारवाई केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे. यात कर्जत ग्रामपंचायतीचा समावेश आहे. आर्थिक वर्षांच्या अखेरीसच ही कारवाई झाल्याने ग्रामंपचायतींच्या विकास कामांमध्ये मोठा अडथळा होऊन निधी परत जाण्याची शक्यताही त्यामुळे व्यक्त होत आहे.  
थकबाकी वसुलीसाठी महसूल विभागाने राज्यात प्रथमच अशा स्वरूपाची कारवाई केली असावी असे सांगण्यात येते. तालुक्यात महसूल विभागाला २५७ कोटी रूपयांचा महसूल येणे आहे. आत्तापर्यंत ६८ कोटी रूपये वसुल झाले असून उर्वरीत थकबाकीच्या वसुलीसाठी महसूल यंत्रणा सरसावली आहे.
मागच्या तीन वर्षांत तालुक्यातील ग्रामपंचायतींनी विविध कामे केली. त्यासाठी दगड, माती, मुरूम, खडी, वाळू अशा गौण खनिजाचा मोठय़ा प्रमाणावर वापर करण्यात आला. ग्रामपंचायतींच्या अंदाजपत्रकात या गौण खनिजाच्या स्वामित्वधनाची रक्कम शासनास जमा करण्याच्या तरतुदी आहेत. सर्व कामांची गौण खनिज रक्कम भरल्याशिवाय ठेकेदारांना अंतिम बीले व काम पुर्णत्वाचे प्रमाणपत्रही देता येत नाही. मात्र तालुक्यात या गोष्टीचे सर्रास उल्लंघन झाले आहे. शिवाय, यासंदर्भात विचारणा करूनही ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी कोणतीच माहिती देत नाहीत. त्यामुळे शासनाच्या रक्कमेचा अपहार झाला आहे व वारंवार मागुनही शासनाचा कर भरला नाही. ही थकबाकी वसुल होईपर्यंत सर्व ग्रामपचायतींचे जमाखर्चाचे बँकेतील व्यवहार स्थगित करून जमीन महसूल थकबाकी वसूल करण्याचे पत्र दिपा मुधोळ यांनी दिले आहे. त्यासाठी नायब तहसीलदार जैयसिंग भेसडे, आर. एस. रावते, आर डी. महामुनी, बी. एम. अवसरे, विश्वजित चौघूले यांचे वसुली पथक नेमण्यात आले आहे. या पथकाला अटक करण्यापर्यंत अधिकार देण्यात आले आहेत.

Story img Loader