आरे वसाहतीमधील २७ पाडय़ांना मूलभूत सुविधा देण्यात आल्या असून उर्वरिच पाच पाडय़ांनाही वीज-पाण्यासह सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्याबाबत येत्या आठवडाभरात बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही नगरविकास राज्यमंत्री रणजित पाटील यांनी बुधवारी विधान परिषदेत दिली. तसेच या पाडय़ांना सुविधा देण्यात महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असेल तर त्यांच्यावरही कारवाई करू असेही त्यांनी सांगितले.
अतिक्रमणांचे नाव देऊन अनेक वर्षे वीज-पाण्याच्या अधिकृत जोडण्यांपासून वंचित असलेल्या आरेमधील २७ पाडय़ांपैकी नऊ पाडय़ांमध्ये नुकत्याच विजेच्या तारा पोहोचल्या असल्या तरी वणीचा पाडा, जितुनीचा पाडा आणि नवशाचा पाडा आदी वस्त्यांमध्ये वीज-पाण्याची सुविधा नसल्याबद्दल भाई गिरकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर सभागृहात जोरदार चर्चा झाली. चित्रनगरी आणि फोर्स वन यांचे ना हरकत प्रमाणपत्र न मिळल्याने या वसाहतींसाठी पाणीपुरवठय़ाची व्यवस्था करण्यात अडचणी आल्याचे राज्यमंत्र्यांनी सांगितले. त्यावर सर्वपक्षीय सदस्यांनी राज्यमंत्र्याना धारेवर धरले. या ठिकाणी आदिवासी हे मूळचे रहिवासी असून फोर्स वन आणि चित्रनगरी हेच उपरे आहेत. फोर्सवनला तेथील आदिवासींना हुसकावून लावायचे आहे. एवढेच नव्हे तर याच ठिकाणी एकता कपूर यांच्या बालाजी टेलिफिल्मचा स्टुडिओ असून त्यांना सर्व सुविधा कशा मिळतात. मोठय़ा हॉटेल्सला ना हरकत प्रमाणपत्र कसे मिळते अशा प्रश्नाचा भडिमार सदस्यांनी केला. त्यावर या पाडय़ांमध्ये आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या लगेच दिल्या जातील. फोर्स वन आणि चित्रनगरीचेही ना हरकत प्रमाणपत्र दिले जाईल आणि सर्व सुविधा निर्माण केल्या जातील असे राज्यमंत्र्यांनी सांगितले.

Story img Loader