आ. सुरेश जैन यांच्या नेतृत्वाखालील गटाकडून तत्कालीन नगर पालिका तसेच सध्याच्या महापालिकेतील तब्बल २७ वर्षांच्या प्रदीर्घ सत्ता काळात घडलेल्या सर्वच गैरव्यवहारांची चौकशी राज्य शासनाकडून करण्यात येणार असल्याच्या वृत्ताने शहरातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्याच्या नगरविकास विभाग सचिवांनी ही माहिती तातडीने मागविली असल्याचे समजते.
तत्कालीन जळगाव पालिकेत सुरेश जैन यांच्या नेतृत्वातील सत्ताकाळ १९८५ पासून सुरू झाला. २००१-०२ या वर्षांचा अपवाद वगळता महापालिकेतही त्यांच्याच गटाचे वर्चस्व राहिले. या कार्यकालात विविध योजना, प्रकल्प राबविताना प्रचंड गैरव्यवहार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ज्येष्ठ नगरसेवक नरेंद्र पाटील व काँग्रेसचे
ज्येष्ठ कार्यकर्ते उल्हास साबळे
यांनी या विरोधात सातत्याने आवाज उठविला आहे. पालिका व महापालिकेच्या सभांमध्ये सत्ताधारी गटाने अनेक वादग्रस्त ठराव बहुमताने मंजूर करून घेतले. नरेंद्र पाटील यांचा अपवाद वगळता त्याविरुद्ध कोणीही विरोध नोंदविला नाही. पालिकेचा घरकुल घोटाळा हा त्यातीलच एक वादग्रस्त प्रकल्प. या प्रकल्पातंर्गत सुमारे २९ कोटी रुपयांचा गैरव्यवहाराचा गुन्हा नोंदविला गेला असून या प्रकरणात सुरेश जैन नऊ महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत आहेत. पालकमंत्री गुलाब देवकर यांनाही या प्रकरणी अटक करण्यात आली होती. परंतु त्यांना जामीन मिळाला. अनेक आजी-माजी नगरसेवक, माजी नगराध्यक्ष व महापौर घरकुल प्रकरणी अडचणीत आले आहेत. वाघूर पाणी पुरवठा योजना व इतर गैरव्यवहारांचे विविध गुन्हेही पोलिसांत दाखल झाले आहेत. दरम्यान, राज्य शासनाच्या नगर विकास विभागाने आता पालिकेच्या १९८५ पासूनच्या म्हणजेच २७ वर्षांच्या लेखा परीक्षणात आढळून आलेल्या दोषांची माहिती तातडीने मागविल्याने येथे प्रचंड खळबळ उडाली आहे. २६ डिसेंबर रोजी या संदर्बातील फॅक्स महापालिकेत आल्याचे सांगण्यात येते. पालिकेच्या लेखा परीक्षणात निदर्शनास आलेले गैरव्यवहार कोणते, त्यात दोषारोप ठेवण्यात आलेल्यांची नावे, संबंधित योजना व ठरावांना समर्थन देणाऱ्या नगरसेवक, नगराध्यक्षांची नावे मागविण्यात आली आहेत.   

Story img Loader