भीषण पाणीटंचाई, दुष्काळ आणि चारा छावण्यांचे अनुदान न मिळाल्याने भारतीय जनता पक्षाचे नेते खासदार गोपीनाथ मुंडे यांनी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले. तत्पूर्वी दिलेल्या १८ मागण्यांच्या निवेदनांमुळे प्रशासकीय पातळीवर नवाच गुंता निर्माण झाला आहे. पूर्वी दिलेल्या निवेदनात चारा छावण्या, टँकर व रोजगार हमीवरील देयके वेळेवर दिली जात नाही, असे निवेदन देण्यात आले होते. मात्र, नव्याच निवेदनाने प्रशासनाची धावपळ उडाली. दरम्यान, मुंडे यांच्या उपोषणाच्या समर्थनार्थ उद्या (मंगळवारी) सर्व जिल्ह्य़ांमध्ये रास्ता रोको आंदोलन केले जाणार आहे.
जायकवाडी धरणात वरच्या बाजूला अडविण्यात आलेल्या ९ टीएमसी पाणी एकदाच सोडावे, दुष्काळी भागात शिरपूर पॅटर्न राबवावा, सिमेंट साखळी बंधारे बांधावेत, टँकरची संख्या वाढवावी, विहिरी अधिग्रहित कराव्यात, दुष्काळामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत द्यावी, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे वीजबिल माफ करावे, विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करावे, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे कर्ज माफ करावे, यासह विविध १८ मागण्यांचे निवेदन सोमवारी देण्यात आले.
तत्पूर्वी दिलेल्या चारा छावण्यांचे अनुदान तातडीने मंजूर करावेत, अशा प्रकारच्या दिलेल्या निवेदनाला प्रशासनाकडून उत्तर देण्यात आले. तथापि, नव्याने १८ मागण्या समोर आल्याने व त्याही धोरणात्मक स्वरूपाच्या असल्याने प्रशासकीय पातळीवर त्यामुळे नवाच पेच तयार झाला. दरम्यान, पालकमंत्री बाळासाहेब थोरात यांनीही मुंडे यांच्याशी चर्चा केली. मदत व पुनर्वसन मंत्री पतंगराव कदम यांनीही धोरणात्मक मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांच्या कानी घालू, असे कळविल्याचे भाजप कार्यकर्त्यांनी सांगितले. तथापि, मागण्यांबाबत सरकारने चर्चा करावी, अशी भूमिका मुंडे यांनी घेतली आहे.
दिवसभर औरंगाबादसह मराठवाडय़ातील दुष्काळी जिल्ह्य़ातील व तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी उपोषणस्थळी भेट दिली. मुंडे यांच्यासमवेत अनेक कार्यकर्ते उपोषणाला बसले आहेत. खासदार रावसाहेब दानवे, माजी महापौर विजयाताई रहाटकर, डॉ. भागवत कराड, माजी आमदार श्रीकांत जोशी, पाशा पटेल, हरिभाऊ बागडे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले. तर कार्यकर्त्यांनी दुष्काळग्रस्त  नागरिकांच्या व्यथा मांडल्या.