नगरसूल येथील सरपंच प्रमोद पाटील यांच्याविरूध्द दाखल झालेल्या बलात्काराच्या गुन्ह्याचे निमित्त होऊन येवला तालुक्यातील सर्व भुजबळ विरोधक एकत्र आल्याचे दृश्य येथे पाहावयास मिळाले. सर्वपक्षीय कृती समितीच्या वतीने काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाप्रसंगी जिल्हा बँकेचे अध्यक्ष अद्वय हिरे यांनी थेट भुजबळांवर तोफ डागली. तर, इतरांनी राजकारणाचा वापर करून दाखल होणाऱ्या गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त करीत अप्रत्यक्षरित्या टीकास्त्र सोडले.
सरपंचांविरूध्द दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी सर्व नेते एकत्र जमले. यावेळी सर्व पक्षांच्या वतीने शहरातून मोर्चा काढण्यात आला. विंचूर चौफुलीवरील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चाची सुरूवात झाली. मोर्चा टिळक मैदानावर आल्यानंतर सभा झाली. यावेळी मोर्चात माजी आमदार कल्याणराव पाटील, माजी मंत्री तुकाराम दिघोळे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ थोरे, एन. एम. आव्हाड, माजी आमदार जगन्नाध धात्रक आदी उपस्थित  होते. मोर्चेकऱ्यांमध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग राहिला. यावेळी उपस्थितांनी राजकीय षडयंत्र बंद करा, राजकीय शक्तीखाली लोकशाहीचा गळा दाबू नका, सरकारी यंत्रणेचा गैरवापर करू नका, खोटय़ा गुन्ह्यांचा धिक्कार असो, आदी घोषणा दिल्या. यावेळी अद्वय हिरे यांनी विकासाची भुरळ पाडणाऱ्या राजकीय मंडळींनी नागरिकांना कितपत प्राथमिक सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या, असा सवाल केला.
थेट भुजबळांना लक्ष्य करीत हिरे यांनी त्यांच्या विकास कामांची खिल्ली उडविली. भुजबळ गटाकडून किंवा समता परिषदेच्या वतीने जर कधी कोणावर हल्ला झाला तर त्यांचा बिमोड करा, अशी आक्रमक भूमिका त्यांनी घेतली. दिघोळे यांनी राजकारणाचा दूरूपयोग करीत दाखल होणाऱ्या गुन्ह्यांविषयी चिंता व्यक्त केली. या अपवृत्तीच्या विरोधात एकत्र येण्याचे आवाहन केले. माजी आमदार पाटील यांनी या मोर्चात अनुपस्थित असलेल्या नरेंद्र दराडे, संभाजी पवार, माणिकराव शिंदे यांच्याविषयी नाराजी व्यक्त करीत स्वतवर नाशिक येथे दाखल झालेल्या खोटय़ा गुन्ह्यांचाही उल्लेख केला. महिला आघाडीच्या ज्योती सुपेकर यांनी महिलांनी आपल्यावरील अत्याचाराविरोधात पुढे येण्याचे आवाहन करतांना उगाचच कोणाला अडकविण्यासाठी कायद्याचा आधार घेऊ नये, असे आवाहन केले. प्रास्ताविक भाजपचे ज्येष्ठ नेते धनंजय कुलकर्णी यांनी केले.

Story img Loader