जिल्ह्य़ात गरज नसताना शिवकालीन बंधारे उभारून वरिष्ठ प्रभारी भूवैज्ञानिक यजदानी यांनी निधीचा गैरवापर, तसेच अफरातफर केल्याचा आरोप करीत सोमवारी जिल्हा परिषदेत सर्वपक्षीय सदस्यांनी अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर सभात्याग केला. या अधिकाऱ्याची चौकशी करून पदभार काढून घेण्याची मागणीही सभागृहाने केली. सभात्यागानंतर जि.प. अध्यक्षा मीना बुधवंत, उपाध्यक्ष समशेर वरपुडकर, गटनेते बाळासाहेब जामकर आदींसह सदस्यांनी पत्रकारांसमोर आपली भूमिका मांडली.
जि.प.ची सर्वसाधारण सभा सोमवारी झाली. सभेत सुरुवातीला अर्थसंकल्प मंजूर झाल्यानंतर सदस्यांनी शिवकालीन बंधाऱ्याविषयी चर्चा सुरू केली. २०१२-१३ साठी जिल्ह्य़ातील शिवकालीन बंधाऱ्यास १२ कोटी, सोलरपंपासाठी ७ कोटी निधी आला होता. मात्र, या योजनेचे मुख्य अधिकारी व वरिष्ठ प्रभारी भूवैज्ञानिक यजदानी यांनी मनमानी कारभार करीत निधीचा गैरवापर केला, असा आरोप सदस्यांनी केला. गरज नसताना बंधारे उभारले. सोनपेठ तालुक्यातील वडी, पालममधील बनवस येथे मुबलक पाणी असताना ४-४ बंधारे उभारून निधी हडपण्यात आला.
यजदानी यांना विचारणा केली असता त्यांनी सभागृहाला उडवाउडवीची उत्तरे दिल्याने अध्यक्षांसह सर्वपक्षीय सदस्यांनी सभात्याग केला. पाथरी तालुक्यातील डोंगरगाव येथे तीव्र पाणीटंचाई असताना तेथे एकही बंधारा उभारला नाही. या बाबत सदस्यांनी यजदानी यांना विचारले असता त्यांना उत्तर देता आले नाही.
जिल्ह्य़ात शिवकालीन व सिमेंट बंधारे यांच्यासाठी १२ कोटी आले होते. तसेच ग्रामपंचायतीला सोलार पंप देण्यासाठीही ७ कोटी निधी आला होता. मात्र, यजदानी यांनी मनमानी कारभार करीत निधीचा दुरुपयोग केल्याचा आरोपही पत्रकारांशी बोलताना गटनेते जामकर यांनी केला. मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्याकडे या बाबत तक्रार केली असून आयुक्तांमार्फत यजदानी यांची चौकशी करावी, चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांच्याकडील पदभार काढून घ्यावा, अशी मागणी केल्याचे जामकर म्हणाले. भरत घनदाट, दादासाहेब टेंगसे, दिनेश बोबडे, राजेश विटेकर, राजेंद्र लहाने आदींसह जि.प. सदस्य या वेळी उपस्थित होते.
जि.प.चे शिलकी अंदाजपत्रक
जि.प.च्या सन २०१३-१४ च्या २९ लाख ५५ हजार ४६५ रुपये शिलकी अर्थसंकल्पास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. जि.प.चे २०१३-१४ मध्ये ९ कोटी २५ लाख ३३ हजार ८६५ रुपये उत्पन्न गृहीत धरले आहे. ८ कोटी ५५ लाख ७८ हजार ४०० रुपये महसुली खर्च अपेक्षित आहे. अर्थ व आरोग्य सभापती चंद्रकला कोल्हे यांनी अर्थसंकल्प मंजुरीसाठी विशेष सभेत सादर केला. मुख्य कार्यकारी अधिकारी मित्रगोत्री, जि.प. अध्यक्षा बुधवंत, उपाध्यक्ष वरपुडकर आदी उपस्थित होते.
जि.प.च्या उत्पन्नात सामान्य उपकर, वाढीव उपकर, स्थानिक उपकर, सापेक्ष अनुदान व मुद्रांक शुल्क अनुदान आदी बाबींचा समावेश आहे. याशिवाय पाणीपट्टी, अभिकरण आकार, वाहन महसूल अनुदान, व्यवसाय कर अनुदान, व्याज, दवाखाना शुल्क, निविदा विक्रीतून उत्पन्न, निवासस्थान भाडे आदींमधून जि.प.ला उत्पन्न मिळणार आहे. स्थानिक कर, व्यवसाय कर, मुद्रांक शुल्क, पाणीपट्टी आदींमधून मिळणाऱ्या १ कोटी ९८ लाख ११ हजार ८३० रुपयांमधून ५० टक्के म्हणजे ९९ लाख ५ हजार ९१५ रुपयांची तरतूद समाजकल्याण, ग्रामीण पाणीपुरवठा, महिला व बालकल्याण या तीन विभागांवर खर्च करण्यासाठी राखून ठेवण्यात आली.

Story img Loader