मालमत्ता कराविरोधात आज भद्रावती नगरपालिकेवर सर्वपक्षीय मोर्चाने धडक दिली. व्यापाऱ्यांसह हजारोंच्या संख्येत भद्रावतीकर या मोर्चात सहभागी झाल्याने नगरपालिका प्रशासन हादरून गेले. या वेळी मुख्याधिकारी डॉ. विजय इंगोले यांनी निवेदन स्वीकारून यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.
भद्रावती नगर पालिकेने मालमत्ता करात भरमसाट वाढ केल्याने लोकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. या प्रश्नावर सर्वच राजकीय पक्षांनी व मालमत्ताधारक व व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन नगरपालिकेवर मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आज सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शहराच्या मुख्य मार्गाने निघालेला हा मोर्चा पालिका कार्यालयावर धडकताच प्रशासन हादरले. या वेळी मुख्याधिकारी डॉ. इंगोले यांना मालमत्ता कर कमी करण्यासोबतच विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. तसेच या संदर्भात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकासमंत्र्यांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन देणार असल्याचे सर्वपक्षीय नेत्यांनी सांगितले. या मोर्चात शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सुनील नामोजवार, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष मुनाज शेख, तालुका काँग्रेस समितीचे अध्यक्ष भोजराज झाडे, भाकपाचे जिल्हा सहसचिव राजू गणवीर, पत्रकार संघाचे दिलीप मांढरे, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक हजारे, अफजल भाई, मनसेचे मनोज खरवडे, चंद्रकांत गुंडावार, व्यापारी असोसिएशनचे प्रकाश पाम्पट्टीवार, सराफा असोसिएशनचे विनोद घोडे, युवा शक्तीचे बाळा उपलंचीवार यांच्यासह हजारो लोक सहभागी झाले होते.