खारघरच्या टोलनाका ऐन विधानसभा निवडणुकांपूर्वी उभारला जात असल्याने या टोलनाक्यातून प्रत्यक्षात वसुली होण्याअगोदर पनवेलचे राजकीय समीकरण बदलवूण टाकणारा ठरत आहे. जनतेचे कैवारी असलेल्या सर्वच राजकीय पक्षांनी या टोलनाक्यातून स्थानिक वाहनचालकांना सूट मिळावी ही भूमिका घेतली आहे. यामध्ये राज्याच्या सत्तारूढ काँग्रेस पक्षाचे आमदार प्रशांत ठाकूर यांनीही ‘जनतेसाठी कायपण’ ही भूमिका मांडत त्यांना सत्तेतील विरोधक अशा दशेत आमदार ठाकूर गेले आहेत. ११ जुलै रोजी आमदार ठाकूर काँग्रेस व आघाडीच्या चमूसह रास्तारोको करणार आहेत.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याकडे तसे निवेदन आमदार ठाकूर यांनी दिले. मात्र मुख्यमंत्र्यांची निर्णायक भूमिका नसल्याने मुख्यमंत्री चव्हाण यांच्या धोरणलकवेगिरीचा फटका स्थानिक वाहनचालकांसह सत्तेतील काँग्रेसचे आमदार ठाकूर यांनाही बसल्याचा यावरून पाहायला मिळतो.
आमदार ठाकूर यांनी या टोलनाक्याला विरोध नसून स्थानिक वाहनचालकांनी त्याचा भरुदड कशासाठी अशी बाजू मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या दरबारी मांडली आहे. मुख्यमंत्र्यांनी यावर ११ तारखेपर्यंत निर्णय न घेतल्यास सुमारे १० हजार कार्यकर्त्यांच्या मदतीने सायन-पनवेल मार्गावर टोलनाका उभारणीच्या ठिकाणी रास्तारोको करण्याचा निर्वाणीचा इशारा आमदार ठाकूर यांनी दिला आहे. या आंदोलनात राष्ट्रवादी काँग्रेसही खांद्याला खांदा लावून रास्तारोकोमध्ये सामील होणार आहे. रायगडचे पालकमंत्री सुनील तटकरे यांचाही या आंदोलनात सहभाग असणार असल्याचे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भीमसेन माळी यांनी सांगितले.
सोमवारी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबईतील राष्ट्रवादीच्या मेळाव्यात केलेल्या जाहीर भाषणामध्ये या टोलनाक्याचा भार नवी मुंबईकरांवर पडू देणार नाही, असे म्हटले आहे. नेमके सत्ता हातात असतानाही आघाडीचे हे सर्व नेते या टोलनाक्याला का विरोध करतात हे सामान्यांच्या समजण्यापलीकडचे आहे. मुंबईच्या प्रवेशद्वारावर वाशी येथील टोलवसुली केली जाते.
१४ किलोमीटर अंतरावर खारघर येथील टोलनाक्यावर चारचाकी वाहनांसाठी एका वेळेसाठी किमान ३० रुपये आणि एकाच दिवसात परताव्याचा प्रवास करायचा असल्यास ५५ रुपये टोल मोजल्यानंतरच वाहनचालकांना हा तुळतुळीत रस्त्यावरून प्रवास करता येणार असल्याचे हा रस्ता बांधणाऱ्या विकासक कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे. काँग्रेस पक्ष लोकसभेच्या निवडणुकीत जनतेच्या मनात गमावलेली जागा कायम करण्यासाठी आमदार ठाकूर हे आंदोलन करत आहे.
खारघर टोलनाक्यास सर्वच राजकीय पक्षांचा विरोध
खारघरच्या टोलनाका ऐन विधानसभा निवडणुकांपूर्वी उभारला जात असल्याने या टोलनाक्यातून प्रत्यक्षात वसुली होण्याअगोदर पनवेलचे राजकीय समीकरण बदलवूण टाकणारा ठरत आहे.
First published on: 09-07-2014 at 07:04 IST
मराठीतील सर्व महामुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All political parties protest against kharghar toll naka