लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात आता रंग भरू लागला असला तरी या भागात प्रचार सभा घेणारे राजकीय पक्षाचे नेते नक्षलवादाच्या प्रश्नावर मात्र एक अवाक्षरही काढायला तयार नाहीत. नेत्यांनी या प्रश्नावर साधलेले मौन सध्या पूर्व विदर्भात चर्चेचा विषय ठरले आहे.
गेल्या ३० वर्षांंपासून पूर्व विदर्भात नक्षलवादी चळवळीने मूळ धरले आहे. या चळवळीकडून होणारा हिंसाचार सर्वाच्या चिंतेचा विषय राहिलेला आहे. या काळात नक्षलवाद्यांनी ७०० पेक्षा जास्त आदिवासींना, तर ५०० पेक्षा जास्त पोलिसांना ठार मारले. या हिंसाचारामुळे पूर्व विदर्भाच्या दुर्गम भागातील जनता कायम दहशतीत वावरत असते. नक्षलवादाची समस्या सोडवण्याची भाषा सर्वच राजकीय पक्ष करत असले तरी देशाचे भवितव्य ठरवणाऱ्या या लोकसभेच्या निवडणुकीत या पक्षांनी या समस्येवर चुप्पी साधल्याचे आता स्पष्ट झाले आहे. पूर्व विदर्भातील नक्षलग्रस्त भागात येत्या १० एप्रिलला मतदान होणार आहे. त्यामुळे या भागातील प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. सर्वच राजकीय पक्षाचे नेते हवाई मार्गाचा वापर करून या भागात जाहीरसभा घेत आहेत. मात्र, यापैकी एकाही सभेत नेत्यांकडून या प्रश्नावर भूमिका मांडली जात नाही, असे दिसून आले आहे. भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर व चंद्रपूर-वणी या मतदारसंघात या चळवळीचा प्रभाव आहे. या तीनही मतदारसंघात हे नेते या प्रश्नावर चुप्पी साधत असल्याचे दिसून आले आहे.
या भागात आतापर्यंत मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, भाजपचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते विनोद तावडे, आपच्या नेत्या अंजली दमानिया या नेत्यांच्या सभा झाल्या. यापैकी एकाही नेत्याने नक्षलवादाच्या प्रश्नावर पक्षाची भूमिका मांडली नाही. या भागात प्रचार करणाऱ्या नेत्यांनी नक्षलवादाच्या प्रश्नावर जाहीरसभांमधून भूमिका मांडून दहशतीत वावरणाऱ्या जनतेला दिलासा द्यावा, अशी मागणी या भागात शोधयात्रा काढणारे प्रा. अरविंद सोहनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली होती. तशी पत्रकेही या शोधयात्रींनी या भागात वितरित केली होती. या भागात फिरणारे राजकीय नेते या प्रश्नावर नेमके काय बोलतात, याकडे पोलीस व सुरक्षा दलांचे सुद्धा लक्ष लागले होते. मात्र, या सर्वाच्या पदरी निराशा पडली आहे. या तीन मतदारसंघात जाहीरसभा घेणाऱ्या नेत्यांनी विरोधकांची ऊणीदुणी काढण्याशिवाय काहीही केले नाही. जनतेला भेडसावणाऱ्या प्रश्नावर हे नेते काहीही बोलायला तयार नसल्याचे आतापर्यंत झालेल्या जाहीरसभांमधून स्पष्ट झाले आहे.

Story img Loader