वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील चतुर्थ श्रेणी कर्मचारी आणि सफाई कामगार यांची पदे शासनाने ‘आऊटसोर्सिग’ने भरण्याचे ठरविले असले तरी  मेडिकलच्या जाती-जमाती कर्मचारी संघाने फक्त कामगारांची पदे ‘आऊटसोर्सिग’ने भरण्याऐवजी सर्वच श्रेणीची पदे ‘आऊटसोर्सिग’ने भरा, अशी मागणी करत शासनाच्या आऊटसोर्सिगला तीव्र विरोध दर्शविला आहे.
वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी मेडिकल दंत रुग्णालयाला भेट दिल्यानंतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आऊटसोर्सिगने भरणार असून १५ जानेवारीपर्यंत आऊटसोर्सिग होणार, असे ते म्हणाले. १४०० परिचारिकांच्या जागा भरण्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांत ९वी ते १०वी वर्ग शिक्षण घेतलेले असून ९० टक्के मागासवर्गीय, मध्यमवर्गीय, आदिवासी व इतर मागासवर्गीय कर्मचारी या पदावर काम करतात. सर्वत्र महागाई प्रचंड प्रमाणात वाढली असून कर्मचाऱ्यांची भरती करण्याऐवजी बेकारी निर्माण केली जात असल्याचा आरोप कर्मचारी संघाने
केला.