सोफिया चौधरी, पायल रोहतगी, समीरा रेड्डी, ईशा गुप्ता, मुग्धा गोडसे, आरती छाब्रिया, तनुश्री दत्त, याना गुप्ता, सराह जान अशा स्फोटक तारकांनी चित्रनगरीच्या जंगलात एकत्र येऊन ‘यापुढे आयटेम डान्सचा तडका’ नाचवणार नाही अशी कठोर शपथ घेतली (याचा अर्थ त्या अभिनयाच्या अवघड वाटेला जाणार आहेत असा नव्हे!). आयटेम डान्समुळे होणारे सामाजिक-सांस्कृतिक क्षेत्रातील गढूळ वातावरण दूर व्हावे अशी या प्रत्येकीची इच्छा असली तरी ती व्यक्त कशी करायची याचे ज्ञान नसल्याचे स्पष्ट झाले.
माधुरी दीक्षित-नेने मराठीत
‘चांगली पटकथा असेल तर मराठी चित्रपटातून मी नक्की भूमिका करेन,’ असा १९८४च्या ‘अबोध’पासूनचा माधुरी दीक्षित-नेने हिचा ‘सुविचार’ अखेर मार्गी लागला. तिने ‘दिसला गं बाई दिसला’ या लावणीप्रधान चित्रपटातील भूमिका स्वीकारली. ‘पिंजरा’तील याच मुखडय़ाचे गाणे तिचे अत्यंत आवडते असल्यानेच तिच्या चित्रपटासाठी हेच नाव ‘सही’ असल्याचे मानले गेले. तिच्याभोवती फेर धरणाऱ्या नृत्यतारकांत मनीषा केळकर, दीपाली सय्यद, रेशम टिपणीस, सई लोकूर, श्रुती मराठे, अनुया दुगल, निशा परुळेकर अशा सातजणींची निवड होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
‘मराठी युवतीं’च्या भूमिकेत मराठी तारका
‘सिंघम’ची काव्या भोसले (काजल अगरवाल), ‘इंग्लिश विंग्लिश’ची शशी गोडबोले (श्रीदेवी), ‘अय्या’ची मीनाक्षी देशपांडे (राणी मुखर्जी), ‘खिलाडी ७८६’ची इंदू तेंडुलकर (असिन) अशा हिंदी चित्रपटांतील ‘मराठी युवतीं’च्या भूमिकेसाठी हिंदी अभिनेत्री(च) निवडण्याचा ‘फंडा’ पुरे झाला असे मानतच यापुढे हिंदी चित्रपटातील ‘मराठी युवतीं’च्या भूमिकेसाठी मराठी चित्रपटसृष्टीतीलच तारका निवडावी असे करण जोहर, रोहित शेट्टी, साजिद खान आदींनी ठरविले आहे.
अनुष्का शर्माचे मराठीचे धडे
आमिर खानने ‘मराठीचे धडे’ नेमके किती गिरविले याचे पुरावे सापडण्यापूर्वीच अनुष्का शर्मा हिने ‘ग’ गळतीचा, ‘म’ मजबुरीचा, ‘भ’ भक्तीचा, व ‘न’ नफरतचा असे मराठीचे धडे हिंदीत शिकायचा वर्ग सुरू केला आहे. ‘मराठी मुंबई’त निदान अभिनेत्रींना तरी उत्तम मराठी शिकवायला चांगला ‘मराठी मास्तर’ मिळत नसल्याने तिने ‘एका भय्याची शिकवणी’ लावली. विशेष म्हणजे, त्याचे मराठी शुद्ध व ओघवते असल्याचे अनुष्का शर्माने इंग्रजीत म्हटले आहे.
‘मेरे पास अपनी हँसी है’ दीपिकाचा दावा
मधुबाला, माधुरी दीक्षित यांच्याप्रमाणेच आपलेही हास्य नैसर्गिक आहे, ते व्यक्त करण्यासाठी वेगळे कष्ट घ्यावे लागत नाहीत, असे दीपिका पदुकोणने म्हटले असून याच नावाच्या चित्रपटातून भूमिका करू असेही तिने आश्वासन दिले आहे. परंतु, आपण मंगलोरच्या असल्याने हाच चित्रपट कन्नड भाषेत तर प्रभादेवीची रहिवासी असल्याने मराठी भाषेत ‘डब’ करण्यात यावा, अशीही अपेक्षा तिने व्यक्त केली.
‘सुपारी’पेक्षा अभिनय महत्त्वाचा (म्हणे)
बारसे, पहिला वाढदिवस, शाळेतला पहिला दिवस, लग्नाची बोलणी, पत्रिका पाहणे, लग्नसोहळा, लग्नाचा स्वागत समारंभ, हनिमून शुभेच्छा, डोहाळे सोहळा असे कौटुंबिक कार्यक्रम तसेच शाळेचे गॅदरिंग, चहावाल्याचा अड्डा, सलूनचे उद्घाटन, कौलारू घराचे भूमीपूजन अशा प्रकारच्या ‘सुपारी संस्कृती’साठी यापुढे तारखा न देता त्या वेगळ्या प्रवाहातील मराठी चित्रपटांसाठी देण्याचा काही कलाकारांनी निश्चय व्यक्त केला.
संजूबाबाच्या चित्रपटाचे ‘गजाआड’ चित्रण
संजूबाबाच्या साडेतीन वर्षांच्या गजाआड मुक्कामाच्या संभाव्य अडीचशे कोटींचे नुकसान टाळण्यासाठी त्याच्या उर्वरित चित्रपटांचे थेट तेथेच चित्रीकरण करण्याचा ‘सही’ मार्ग काढण्यात यश आले. ‘पोलीसगिरी’, ‘पी.के.’, ‘अलिबाग’ अशा काही चित्रपटांच्या पटकथेत ‘बदलत्या स्थिती’नुसार बदल करण्यात आले (येथे चाणाक्ष दिग्दर्शक दिसतो). ‘चित्रपटात काही कारणास्तव संजूबाबाला गजाआड जावे लागते,’ असा ‘कहानी नया मोड लेती है’. यापूर्वी ‘चोर मचाये शोर’, ‘जोशिला’ असे करता करता ‘जेल’ इत्यादी चित्रपटांसाठी तुरुंगाचा सेट लावावा लागला. त्यापेक्षा संजूबाबामुळे खऱ्याखुऱ्या तुरुंगात चित्रीकरणाची मिळालेली संधी वास्तववादी ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
मल्टिप्लेक्समधील प्रत्येक मराठी चित्रपटाचा प्रत्येक खेळ हाऊसफुल्ल ठरला. (हे तरी एप्रिल फूल ठरू नये)
संकलन : दिलीप ठाकूर