स्थायी समितीत छाजेड, व्यवहारे, तुपे, धंगेकर
शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेत असल्यामुळे या आराखडय़ावर डोळा ठेवूनच स्थायी समितीमध्ये बुधवारी दिग्गजांची वर्णी लावण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, राष्ट्रवादीकडून शहर सुधारणा समितीचे अध्यक्ष चेतन तुपे, तर मनसेचे रवींद्र धंगेकर स्थायी समितीमध्ये गेल्यामुळे सारे काही आराखडय़ासाठी अशीच प्रतिक्रिया नगरसेवकांकडून बुधवारी व्यक्त झाली.
स्थायी समितीतील रिक्त जागांवरील नियुक्त्या बुधवारी मुख्य सभेत पार पडल्या. त्यात काँग्रेसने अभय छाजेड आणि कमल व्यवहारे यांना, राष्ट्रवादीने चेतन तुपे यांना, भाजपने हेमंत रासने, योगेश मुळीक आणि मोनिका मोहोळ यांना, शिवसेनेने पृथ्वीराज सुतार यांना, तर मनसेने रवींद्र धंगेकर यांना स्थायी समितीमध्ये पाठवले. शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा लवकरच प्रसिद्ध होणार असून त्यावर नागरिकांच्या हरकती-सूचना, त्यांची सुनावणी तसेच तो मंजूर करून अंतिम मंजुरीसाठी राज्य शासनाकडे पाठवणे वगैरे प्रक्रिया येत्या काही महिन्यांत होणार आहेत.
आघाडी का युतीचा सदस्य?
हरकती-सूचनांच्या सुनावणीसाठी तसेच आराखडय़ात त्यादृष्टीने काही बदल करण्यासाठी स्थायी समितीमधील तीन सदस्यांची समिती स्थापन होणार असून त्यात राष्ट्रवादीचे दोन, तर काँग्रेसचा एक सदस्य नियुक्त होऊ शकेल, असे चित्र आहे. या समितीत आणखी तीन शासन नियुक्त सदस्य असतील. या नियोजन समितीसाठीच सर्व आटापिटा सुरू असून सत्ताधारी दोन्ही पक्षांनी त्या दृष्टीनेच आपापल्या सदस्यांची निवड केल्याचे स्पष्ट झाले आहे. गेले दोन महिने महापालिकेत राष्ट्रवादी आणि मनसे अशीही युती वेळोवेळी झाली आहे. ही युती पुढेही सुरू राहिली, तर काँग्रेसऐवजी मनसेचे रवींद्र धंगेकर हे राष्ट्रवादीच्या मदतीने या नियोजन समितीवर जाऊ शकतात, अशीही चर्चा आहे. एकूणात विकास आराखडा हा अतिमहत्त्वाचा विषय लक्षात घेऊनच स्थायी समितीची व्यूहरचना झाल्याचे सांगितले जात आहे.
काँग्रेस, राष्ट्रवादीमध्ये मोठी नाराजी
सदस्य निवडीवरून सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांमध्ये मोठी नाराजी पसरली असून या निवडीबाबत या दोन्ही पक्षांमधील नगरसेवक उघडपणे विरोधी तीव्र भावना व्यक्त करत आहेत. या तीव्र प्रतिक्रियांमध्ये त्या त्या पक्षाच्या नेत्यांबद्दलही गंभीर आरोप केले जात असून एकेका व्यक्तीला किती वर्षांसाठी किती पदे देत राहणार, इतरांना संधी देणार का नाही, असे प्रश्न नगरसेवक विचारत आहेत. काँग्रेसच्या कार्यालयातही बुधवारी मोठा गोंधळ झाला.
संग्रहित लेख, दिनांक 21st Feb 2013 रोजी प्रकाशित
सारा खटाटोप विकास आराखडय़ासाठीच
शहराच्या जुन्या हद्दीसाठी तयार करण्यात आलेला विकास आराखडा मंजुरीच्या प्रक्रियेत असल्यामुळे या आराखडय़ावर डोळा ठेवूनच स्थायी समितीमध्ये बुधवारी दिग्गजांची वर्णी लावण्यात आली. काँग्रेसचे शहराध्यक्ष अभय छाजेड, महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष कमल व्यवहारे, राष्ट्रवादीकडून शहर सुधारणा समितीचे
First published on: 21-02-2013 at 02:42 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: All this for development structure