आयआरबी कंपनीने पोटकुळ म्हणून ठेवलेल्या आयर्न हॉस्पिटिलीटीचे बांधकाम महापालिकेच्या ३ लाख चौरस फुटावर सुरू आहे. या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह वळविण्यात आल्याने टेंबलाई भागातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे महापालिकेतर्फे देण्यात आलेला बांधकाम परवाना रद्द करावा व नाल्याचे पात्र पूर्ववत करावे, अशी मागणी गुरुवारी टोलविरोधी कृती समितीच्या वतीने आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी यांना देण्यात आले. बिदरी यांनी याबाबतचे पुरावे सादर करण्याचे आवाहन कृती समितीला दिले. त्यावर कृती समितीने उद्या शुक्रवारी पुन्हा पुराव्यासह आयुक्तांना भेटणार असल्याचे सांगितले.
कोल्हापुरातील एकात्मिक रस्ते कामाचे कंत्राट आयआरबी कंपनीला दिले होते. त्या बदल्यात महापालिकेने आयआरबी कंपनीला तीन लाख चौरस फुटांचा भूखंड दिला आहे. हा भूखंड आयआरबी कंपनीने आयर्न हॉस्पिटिलीटीकडे सोपविला आहे. तेथे काही महिन्यापासून पंचतारांकित हॉटेल बांधण्याचे काम गतीने सुरूआहे. या बांधकामाच्या मध्यातून पूर्वी एक नाला वाहत होता. बांधकामामुळे आयर्न हॉस्पिटिलीटीने तो अन्यत्र वळविला आहे. त्याचे पाणी स्वामी समर्थ नगरातून रस्त्यावरून वाहत आहे. पंधरवडय़ापूर्वी या पाण्याच्या प्रवाहातून एक बालक वाहून गेला होता. सुदैवाने बाजूच्या नागरिकांनी त्याला वाचविले होते. तेव्हापासून या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून त्यांनी रस्त्यावरून वाहणारे पाणी रोखले जावे, अशी मागणी करण्यास सुरुवात केली आहे.
याच मागणीसाठी आज टोलविरोधी कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे, बाबा पार्टे, रामभाऊ चव्हाण, अशोक पोवार, बाबा इंदूलकर, रमेश मोरे, कॉ.दिलीप पवार, अॅड.पंडीत सडोलीकर आदींनी आयुक्त बिदरी यांची भेट घेतली. हॉस्पिटिलीटीच्या बांधकामामुळे निर्माण होत असलेल्या अडचणींची मांडणी त्यांनी केली. बिदरी यांनी या प्रकाराची चौकशी करण्याचे मान्य करतानाच नाल्यासंदर्भातील आणखी पुरावे असल्यास ते सादर करावेत, असे आवाहन कृती समितीला केले. या वेळी महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
आयआरबी कंपनीच्या बांधकामामुळे नाल्याचे प्रवाह वळाल्याचा आरोप
आयआरबी कंपनीने पोटकुळ म्हणून ठेवलेल्या आयर्न हॉस्पिटिलीटीचे बांधकाम महापालिकेच्या ३ लाख चौरस फुटावर सुरू आहे. या पंचतारांकित हॉटेलच्या बांधकामामुळे नैसर्गिक नाल्याचा प्रवाह वळविण्यात आल्याने टेंबलाई भागातील नागरिकांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.
First published on: 03-08-2013 at 01:45 IST
TOPICSकालवा
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Allegation to turn flow of canal due to irb companies construction