‘उपरा’कार लक्ष्मण माने यांना त्यांच्या गैरव्यवहाराबाबत यापूर्वी सावध करण्याचा प्रयत्न केला होता. त्यांच्या समर्थन मोर्चात सहभागी न झाल्याने माझ्यावर त्यांच्याविरुद्ध कट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा आरोप बिनबुडाचा आहे. त्यांनी तो सिद्ध केल्यास दलितमित्र उपाधी परत केली जाईल, असे मत दलितमित्र व्यंकाप्पा भोसले यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. या वेळी धनाजी गुरव, आरपीआयचे नेते अ‍ॅड. पंडितराव सडोलीकर उपस्थित होते.
 ‘उपरा’कार लक्ष्मण माने यांच्याविरुद्ध सहा महिलांनी लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर माने हे सुमारे १५ दिवस बेपत्ता झाले होते. सोमवारी ते पोलिसांना शरण गेले. या वेळी सातारा येथे माने यांनी माझ्याविरुद्ध व्यंकाप्पा भोसले, डॉ. हरि नरके, अ‍ॅड. पल्लवी रेणके यांनी बदनामीचा कट रचला असल्याचा आरोप केला होता. या पाश्र्वभूमीवर आपल्याला आयुष्यातून उठवण्यासाठी सर्व हितशत्रू एकत्र आल्याचेही त्यांनी नमूद केले होते. या पाश्र्वभूमीवर व्यंकाप्पा भोसले यांनी आपले मत मांडले. ते म्हणाले, लक्ष्मण माने यांच्यासोबत आपण जवळपास २३ वर्षे काम करीत आहे. त्यांच्या संस्थेमध्ये अनेक वर्षे संचालक म्हणून काम केले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये संस्थेतील गैरव्यवहार ठळकपणे दिसत होते. कामगारांच्या अडचणीही स्पष्टपणे जाणवू लागल्या होत्या. गैरव्यवहार, कामगार समस्या याबाबत माने यांच्याशी घरी जाऊनही चर्चा केली होती. मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले.माने यांच्याविरुद्ध महिलांनी तक्रारी केल्या तेव्हा माने यांच्या समर्थनासाठी मोर्चा काढला गेला. या मोर्चामध्ये मी सहभागी व्हावे, असे त्यांच्या समर्थकांना वाटत होते. मात्र माने यांनी केलेले कृत्य कधीच समर्थनीय नसल्याने मोर्चाला गेलो नव्हतो. त्यातूनच माने माझ्यावर रागावले आहेत. रागाच्या भरातच त्यांच्याविरुद्ध मी कट केला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. वास्तविक त्यांच्याविरुद्ध कसलाही कट कोणीही रचलेला नाही. त्यांना तसे काही वाटत असल्यास हा आरोप त्यांनी सिद्ध करावा. माझ्यावरील आरोप सिद्ध झाल्यास दलितमित्र पुरस्कार शासनाला परत करण्याची माझी तयारी आहे, असे भोसले म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा