भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांच्या पदाधिका-यांमध्ये मुंबईत वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन, सायंकाळी उशिरा ६८ पैकी सेनेच्या वाटय़ाच्या २९ जागा व भाजपच्या वाटय़ाच्या २७ जागा निश्चित करण्यात आल्या, मात्र ९, १०, ११, १७, २० व २७ या सहा प्रमुख प्रभागांतील १२ जागांचा तिढा युतीत अद्यापि कायम आहे. त्यामुळे एका अर्थाने मुंबईत झालेली चर्चा निष्फळच ठरली, आता या जागांसाठी नगरमध्येच स्थानिक पातळीवर उद्या, सोमवारी चर्चा होईल, असे समजले. त्यानंतरच उद्या रात्री उशिरा युतीचे उमेदवार जाहीर होतील.
नऊ प्रभाग असे आहेत की जेथे दोन्ही जागा भाजपला मिळाल्या आहेत, तर दोन्ही जागा सेनेला मिळाल्या असे ११ प्रभाग आहेत. निश्चित झालेले जागा वाटप असे : प्रभाग १- सेना, भाजप, २- दोन्ही भाजप, ३ व ४- दोन्ही सेना, ५- भाजप, सेना, ६- सेना, भाजप, ७, ८ व १२- दोन्ही भाजप, १३ व १४- दोन्ही सेना, १५- सेना, भाजप, १६- दोन्ही सेना, १८- दोन्ही भाजप, १९- भाजप, सेना, २१- सेना, भाजप, २२ व २३- दोन्ही सेना, २४- दोन्ही भाजप, २५- दोन्ही सेना, २६- दोन्ही भाजप, २८- दोन्ही भाजप, २९- भाजप, सेना, ३० व ३१- दोन्ही सेना, ३२- भाजप, सेना, ३३- दोन्ही सेना, ३४-दोन्ही भाजप.
ज्या प्रमुख प्रभागांबद्दल वाद होते, त्याबद्दल निर्णय घेण्यासाठी मुंबईत विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांच्याकडे बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यासाठी सेनेचे आ. अनिल राठोड, शहरप्रमुख संभाजी कदम, अनिल शिंदे तर भाजपचे खा. दिलीप गांधी, आ. राम शिंदे, आ. शिवाजी कर्डिले, शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर व जिल्हाध्यक्ष प्रताप ढाकणे उपस्थित होते. तावडे यांच्यासहित युतीच्या पदाधिका-यांच्या दिवसभर फे-या सुरू होत्या. त्यातून काही जागांवर तडजोड झालीही, मात्र भाजपच्या काही पदाधिका-यांनी मुंबईला जाताना मध्ये पुण्यात प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन तावडे यांच्याबरोबर होणा-या बैठकीत पक्षहिताचा निर्णय होईल, याकडे लक्ष ठेवण्याची फडणवीस यांना गळ घातली होती. त्यामुळे अखेर वादातील सहा प्रभागांतील १२ जागांबाबत प्रलंबितच राहिला. त्यामुळे आता यावर उद्याच स्थानिक पातळीवर चर्चा होईल, असे समजले.  दरम्यान, युतीचे उमेदवारही या चर्चेनंतर उद्या सायंकाळीच जाहीर होतील, असे सांगण्यात आले.
प्रभाग २० व २७ कळीचा मुद्दा
वादातील प्रमुख २० व २७ हे दोन प्रभाग प्रलंबित आहेत. प्रभाग २० मध्ये खा. गांधी यांचे चिरंजीव सुवेंद्र इच्छुक आहेत. तेथील दोन्ही जागा भाजपला हव्या आहेत, मात्र तेथील एक जागा सेनेच्या विद्यमान नगरसेविकेची आहे, ती सेना सोडायला तयार नाही. प्रभाग २७ मध्ये माजी नगराध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर इच्छुक आहेत, याच प्रभागातून सेनेच्या महापौर शीला शिंदे व भाजपच्याच उपमहापौर गीतांजली काळे इच्छुक आहेत. त्यामुळे आगरकर आग्रही राहिल्यास महापौर व उपमहापौर या दोघांपैकी एकावर गंडांतर येणार हे निश्चित. दरम्यान, भाजपने उमेदवारीचा युतीचा निर्णय घेण्यासाठी स्थापन केलेल्या संचलन समितीचा विस्तार केला आहे, या समितीत आता पाचऐवजी सात सदस्य असतील, माजी आमदार चंद्रशेखर कदम व सदा देवगावकर यांचा त्यात शेवटच्या क्षणी नव्याने समावेश केला आहे.