औरंगाबाद व भोवतालच्या ३०४ गावांच्या महानगर प्राधिकरण नियोजन समितीच्या प्रमुख राजकीय पक्षांनी प्रतिष्ठेच्या केलेल्या निवडणुकीत शहरी विभागातून शिवसेना-भाजप युतीला यश मिळाले, तर ग्रामीण भागात काँग्रेसचे वर्चस्व असल्याचा दावा केला जात आहे. नागरी भागातून निवडून आलेल्यांमध्ये शिवसेनेचे ७, तर भाजपचे ३ सदस्य आहेत.
दरम्यान, या निवडणुकीमुळे शिवसेना व काँग्रेसमधील गटबाजी पुन्हा चव्हाटय़ावर आली. समितीत निवडून येणाऱ्या सदस्यांचे अधिकार कोणते, हे अजून जाहीर झाले नसले तरी मोठय़ा उत्साहात झालेल्या या निवडणुकीत महापालिका क्षेत्रातून १९ तर ग्रामीण क्षेत्रातून १० उमेदवारांना निवडून देण्यात आले.
औरंगाबाद महानगर नियोजन समितीसाठी झालेल्या मतदानाची मोजणी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी विक्रम कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, उपजिल्हाधिकारी पांडुरंग कुलकर्णी आदींची उपस्थिती होती. निवडणुकीत काँग्रेसचे ६, तर शिवसेनेचे ७ सदस्य निवडून आले. भाजपानेही निवडणुकीत चांगला ठसा उमटवला. मात्र, शिवसेना व भाजपमधील गटबाजीही मतदानानंतर स्पष्ट झाली.
१९ जागांसाठी २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. पसंतीक्रमाच्या प्राधान्यानुसार मतमोजणीत काँग्रेसचे अब्दुल रउफखान महमूद खान, रवि कावडे, आनंद घोडेले, रेखा जैस्वाल, प्रमोद राठोड, शहानवाज खान हे नागरी मतदारसंघातून, तर शिवसेनेच्या कला ओझा, सुशील खेडकर, त्र्यंबक तुपे, गजानन बारवाल, विजय वाघचौरे, जगदीश सिद्ध व गिरजाराम हळनोर निवडून आले. राजू वैद्य पराभूत झाले. भाजपचे संजय केनेकर, अनिल मकरिये, संजय चौधरी निवडून आले. वास्तविक, या निवडणुकीत माघार घेतल्याचेच ते सांगत होते. निवडून आलेल्या हळनोर यांचा मताचा कोटा पूर्ण झाला नाही. शेवटचे उमेदवार म्हणून त्यांना विजयी घोषित केले. नागरी भागासाठी ४८१ मतांचा कोटा होता. अनिल जैस्वाल, किशोर नागरे पराभूत झाले. नागरी भागातून निवडून आलेल्यांमध्ये कीर्ती शिंदे, कृष्णा बनकर हे महापालिकेतील अपक्ष नगरसेवक, तर राष्ट्रवादीचे जुबेर गाझी निवडून आले.
महानगर प्राधिकरणासाठी नगरसेवक व ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा अधिकार होता. ग्रामीण विभागासाठी १ हजार ५५५ मतांचा कोटा होता. या विभागात रावसाहेब कापसे, संजय कांजुणे, कृष्णा गावंडे, भागचंद्र ठोंबरे, योगेश दळवी, दिलावर बेग, विलास भुमरे, कांताबाई मुळे, राहुल सावंत व बालाजी हुलसार हे १० सदस्य निवडून आले. ग्रामीण विभागातून ३३ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. या प्राधिकरणावर कोण निवडून येतो, याची मोठी उत्सुकता होती. निकालानंतर गुलाल उधळून जल्लोष करण्यात आला.

Story img Loader