शिवसेना-भारतीय जनता पक्ष युती अभेद्य आहे, मात्र झारीतील शुक्राचार्याना मतदारांनी बाजूला सारावे असे आवाहन आमदार अनिल राठोड यांनी गुरुवारी केले. झारीतल्या शुक्राचार्याना वगळूनही महापालिकेत युतीचा झेंडा फडकवू असे म्हणाले.
भाजपच्याच पावलावर पाऊल ठेवत शिवसेनेने आज त्यांच्या उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ केला. या वेळी बोलताना राठोड यांनी भाजपबाबतचे आक्षेप काय ठेवत युती अभेद्य असल्याचा दावा केला. शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणपती मंदिरात महाआरती करून प्रचाराचा नारळ फोडण्यात आला. महापौर शीला शिंदे, पक्षाचे शहरप्रमुख संभाजी कदम, अन्य पदाधिकारी व अधिकृत उमेदवारांसह नरेंद्र कुलकर्णी, संजय चोपडा (दोघेही भाजप) व सचिन जाधव (शिवसेना) हे बंडखोर उमेदवारही या वेळी उपस्थित होते. कुलकर्णी यांच्या वहिनी प्रभाग २१ अ मध्ये, चोपडा यांनी प्रभाग २० ब मध्ये व जाधव यांनी १८ ब मध्ये बंडखोरी केली आहे.
राठोड म्हणाले, नगरकरांचा शिवसेना व युतीवरच विश्वास आहे. शहराचा विकास युतीच करू शकते याची पूर्ण जाणीव नगरकरांना आहे. मात्र युतीच्या प्रवासात काहींनी अडचणी निर्माण केल्या आहेत. या अडचणी दूर करूनच मनपात युतीची सत्ता आणण्यासाठी कटिबद्ध आहोत. युतीबाबत शहरात अफवा पसरवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मतदारांनी या अफवांना बळी पडू नये असे आवाहन करून युतीच ४० उमेदवार निवडून येतील असा दावा राठोड यांनी केला. युतीच्या निष्ठावान उमेदवारांचाच आपण प्रचार करणार आहोत असे ते म्हणाले.
उमेदवार अनिल शिंदे यांनी या वेळी बोलताना राष्ट्रवादीवर थेट आरोप केला. निवडणुकीच्या काळात राष्ट्रवादीकडून शहरात दहशत निर्माण केली जात आहे असे ते म्हणाले. उमेदवार व आमच्या पदाधिकाऱ्यांना धमकावले जात असले तरी मतदारच या दहशतीला उत्तर देतील असे सांगून राज्य व केंद्र सरकराकडून मनपाला आलेल्या निधीचे युतीनेच उत्तम नियोजन केले असे ते म्हणाले. माजी महापौर भगवान फुलसौंदर यांचेही या वेळी भाषण झाले. पक्षाच्या उमेदवारांसह नंतर शहरातून प्रचारफेरी काढण्यात आली.
अपक्षांसाठी पक्षश्रेष्ठींशी चर्चा
काही अपक्ष उमेदवारांना शिवसेना पुरस्कृत करणार असून, याबाबत पक्षश्रेष्ठींशी चर्चा सुरू आहे. त्यांचा हिरवा कंदील येताच या उमेदवारांना पुरस्कृत करू असे राठोड म्हणाले.  

Story img Loader