* परिवहन प्रशासनाचा प्रस्ताव
* नव्या बस भाडय़ाने घेण्याच्या निविदांना प्रतिसाद नाही
ठाणे परिवहन उपक्रमाने नवीन २५ बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून यासंबंधीची निविदा काढली होती. मात्र, दोन वेळा निविदा काढूनही त्यास ठेकेदारांकडून प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे नवीन बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्यासंबंधीची निविदा पुन्हा काढण्यात येणार आहे. मात्र, त्यासाठी बराच कालावधी जाणार असल्याने ठाणेकरांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.
 त्यामुळे नवीन भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा ताफ्यात दाखल होईपर्यंत जुन्या ठेकेदाराच्या बसगाडय़ा चालविण्यास मान्यता द्यावी, असा प्रस्ताव परिवहन प्रशासनाने तयार केला असून येत्या बुधवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेसमोर तो मंजुरीसाठी आणण्यात आला आहे.
ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात २००६ पासून खासगी २५ सीएनजी बसगाडय़ा भाडेतत्त्वावर चालविण्यात येत असून त्यासाठी मे. अ‍ॅरेक्स ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड लॉजिस्टिक या ठेकेदारासोबत पाच वर्षांचा करार करण्यात आला होता. २०११ मध्ये या बसगाडय़ा संबंधीच्या कराराची मुदत संपली. दरम्यान, २००९-१० मध्ये परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात जे.एन.एन.यू.आर.एम.अंतर्गत दोनशे बसगाडय़ा दाखल होणार होत्या. त्यामुळे खासगी भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा बंद करून त्या जागी ताफ्यात दाखल होणाऱ्या बसगाडय़ा चालविण्याचा विचारविनिमय सुरू होता.
 या कारणास्तव खासगी भाडेतत्त्वावरील बसगाडय़ा घेण्यासंबंधीची मुदतपूर्व निविदा प्रक्रिया करण्यात आली नाही. तसेच परिवहन सेवेच्या ताफ्यात जे.एन.एन.यू.आर.एम.अंतर्गत दोनशे बसगाडय़ा दाखल झाल्या. पण ताफ्यातील जुन्या बसेस नादुरुस्त होण्याचे प्रमाण मोठे होते. परिणामी, कमी बसेस रस्त्यावर धावू लागल्याने प्रवाशांची गैरसोय होऊ लागली. त्यामुळे खासगी २५ बसगाडय़ा पुरविणाऱ्या मे. अ‍ॅरेक्स ट्रॅव्हल्स अ‍ॅण्ड लॉजिस्टिक या ठेकेदाराला पुन्हा एक वर्षांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, ती मुदत २०१२ मध्येच संपली आहे. दरम्यान, परिवहन उपक्रमाने पुढील कालावधीसाठी खासगी २५ बसगाडय़ा भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला असून त्या संबंधीची निविदाप्रक्रिया पूर्ण केली. मात्र, दोन वेळा निविदेस ठेकेदाराकडून प्रतिसादच मिळाला नाही.
त्यामुळे या संबंधीची निविदा पुन्हा काढण्याची प्रक्रिया परिवहन उपक्रमाने सुरू केली आहे. मात्र, त्यास बराच कालावधी जाणार असल्याने नवीन ठेकेदार निश्चित होईपर्यंत जुन्याच ठेकेदाराची मुदत वाढविण्यास मान्यता द्यावी, असे परिवहन उपक्रमाने प्रस्तावात म्हटले आहे.
सध्या परिवहन सेवेच्या ताफ्यात जुन्या ठेकेदाराच्या २५ बसगाडय़ा भाडेतत्त्वावर चालविण्यात येत असून या बसगाडय़ांचे सध्याचे उत्पन्न सरासरी प्रतिकि.मी. ४५ रुपये इतके आहे. त्यापैकी ठेकेदारास प्रतिकि.मी. २६ रुपये ५७ पैसे अदा करण्यात येतात. तसेच वाहकाचे वेतन, बालपोषण अधिभार, प्रवासी कर, तिकीट छपाई खर्च यासाठी या बसगाडय़ांना प्रतिकि.मी ११ रुपये ५० पैसे इतका खर्च येतो. म्हणजेच, या बसगाडय़ांना प्रतिकि.मी सुमारे ३८ ते ४० रुपये खर्च येत असून या बसगाडय़ांपासून प्रतिकि.मी. पाच रुपये इतका फायदा होता, असेही परिवहन उपक्रमाने प्रस्तावात म्हटले आहे.

Story img Loader