यंदा पावसाची सुरुवात समाधानकारक झाली तरी नंतर तो लहरीपणा दाखवेल, असे भाकित काही पंचांगकर्त्यांनी केले आहे. जुलै व ऑगस्टमध्ये पाऊस समाधानकारक असेल. मात्र नंतर तो बेभरवशाचा असेल, असे पंचागंकर्त्यांचे म्हणणे आहे. दाते, राजंदेकर, रुईकर आदी पंचांगांमध्ये पावसाविषयीचे हे भाकित वर्तविण्यात आले आहे.
सूर्याने मृग नक्षत्रात प्रवेश केला की पावसाला सुरुवात होते, अशी पारंपरिक समजूत आहे. यंदा ८ जून रोजी पहाटे ५ वाजून ३५ मिनिटांनी मृग नक्षत्र सुरू होत असून वाहन हत्ती आहे. हत्ती वाहन असल्याने मृग नक्षत्रात सर्वत्र चांगला पाऊस होईल, असा पंचांगकर्त्यांचा अंदाज आहे. २४ मे रोजी बुध-शुक्र, २७ मे रोजी बुध-गुरु तर २८ मे रोजी गुरु-शुक्र युती होत आहे. त्यामुळे जोरदार वारा सुटून काही ठिकाणी वळवाचा तर काही ठिकाणी गारांचा पाऊस पडेल. १९ जून रोजी होणाऱ्या रवी-गुरु युतीमुळे पावसाळयाच्या पूर्वार्धात चांगला पाऊस पडेल. मात्र उत्तरार्धात चांगला पाऊस होण्याची शक्यता नाही. पावसाळ्याच्या चार महिन्यांत पावसाने सरासरी गाठली तरी पुढील वर्षी फेब्रुवारी-मार्च महिन्यापासूनच तीव्र पाणी टंचाईला तोंड द्यावे लागेल, असे दाते पंचांगाचे म्हणणे आहे.
यंदा जूनच्या अखेरीस पावसाला सुरुवात होण्याची शक्यता राजंदेकर पंचांगात व्यक्त करण्यात आली आहे. रोहिणी व मृग या दोन नक्षत्रात थोडय़ाफार प्रमाणात पावसाला सुरुवात होऊन नियमित पाऊस मात्र आद्र्रा नक्षत्रात म्हणजे २३ जून पासून सुरू होईल. पुर्नवसु, पुष्य आणि आश्लेषा या नक्षत्रात म्हणजे जुलै महिन्यात व ऑगस्ट महिन्याच्या पूर्वार्धात चांगला पाऊ होईल असे भाकितही या पंचांगात व्यक्त करण्यात आले आहे. रुईकर पंचांगामध्ये यंदाचा पाऊस लहरीपणा दाखविणार असल्याचे सांगून प्रसंगी तो धोकादायकही ठरणार असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.  

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Almanacators says volatile monsson this year