* जिल्हा उपनिबंधकाचे दुर्लक्ष
* शेतकरी संघटनाही मूग गिळून  
जिल्ह्य़ातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची व्यापाऱ्यांनी अक्षरश: लूट चालविली आहे. नाफेडच्या भरवशावर चालणारा कापूस पणन महासंघ असून नसल्यासारखा झाल्यावर कापूस किंमतीच्या नियंत्रणाचा पार बोऱ्या वाजला. त्यामुळे बाजार समित्यांच्या व्यवस्थांशी आर्थिक तडजोड करून व्यापाऱ्यांनी जिल्ह्य़ातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कापसाचे भाव पाडणे सुरू केले आहे. शेतकऱ्यांच्या लुटीबद्दल तिव्र संताप व्यक्त केला जात आहे.   जिल्ह्य़ातील देऊळगावराजा, चिखली, मलकापूर, खामगाव, मेहकर या प्रमुख बाजारपेठांमध्ये बाजार समित्यांच्या व्यवस्थापनाशी छुपे संगनमत करून कापूस व्यापाऱ्यांनी कापसाचा भाव चार हजार दोनशे रुपयांहून साडे तीन हजारांपर्यंत खाली आणला आहे. जास्तीत जास्त ३७०० रुपये प्रती क्विंटल, असा भाव व्यापारी कापसाला देत आहेत. त्यामुळे शेतकरी गंडवला जात आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला हाच कापूस व्यापारी गुजरात किंवा आंध्रप्रदेशात नेऊन साडेचार हजारापेक्षा अधिक किमतीने विकत आहेत. विशेषत: गुजरातची कापसाची महागडी बाजारपेठ, या व्यापाऱ्यांना पावली आहे. नरेंद्र मोंदीच्या कृपेने व्यापारी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना लुटून आपले व गुजरातचे चांगभले करीत आहेत.  कापूस उत्पादक व्यापाऱ्यांसाठी हे वर्ष दुष्काळातला तेरावा महिना आहे. यावर्षी अत्यल्प पाऊस, बोंड अळी व लाल्याचे आक्रमण यामुळे कापसाचे उत्पादन पन्नास टक्के  घटले आहे. शेतकऱ्यांचा कापूस उत्पादनाचा खर्चही निघेनासा झाला आहे. अशा विपरित परिस्थितीत व्यापारी संगनमत करून कापसाचे भाव पाडून शेतकऱ्यांना खुलेआम लुटत आहेत. कापसाचे भाव स्थिर व चढे ठेवण्याची जबाबदारी कापूस पणन महासंघ, राज्य पणन मंडळ , कृषी उत्पन्न बाजार समित्या, जिल्हा उपनिबंधक, तालुका सहाय्यक निबंधक सहकारी संस्थांची आहे. असे असतांना या सरकारी व्यवस्था शेतकऱ्यांच्या लुटीकडे दुर्लक्ष करीत आहेत.  या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देऊन अडचणीतल्या शेतकऱ्याला दिलासा द्यावा, अशी मागणी आहे. याप्रकरणी शेतकऱ्यांचा कैवार घेणाऱ्या व प्रसिध्दीसाठी आकाश पाताळ एक करणाऱ्या संघटनाही मूग गिळून बसल्याचे चित्र शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे आहे.

Story img Loader