या जिल्हा परिषदेतील सीईओंच्या कक्षात शिरून त्यांना मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या आरोपांतर्गत आज दुपारी १२ वाजताच्या सुमारास जिल्हा परिषदेचे अध्यक्ष नेतराम कटरे, बांधकाम सभापती विजय रहांगडाले, समाजकल्याण सभापती श्रावण राणा, सदस्य मदन पटले, मोरेश्वर कटरे, माजी जि.प. उपाध्यक्ष पंचम बिसेन  व नगरसेवक संजू कुलकर्णी यांना भाजपच्या जिल्हा कार्यालयातून अटक करण्यात आली.
काल जिल्हा परिषद उपाध्यक्ष विनोद अग्रवाल यांना अटक केल्यानंतर आज या साऱ्यांची अटक अटळ होती. त्यामुळे कालच भाजपतर्फे गोंदिया बंदचे आव्हान करून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते, पण रात्री उशिरा पक्षातर्फे घेण्यात आलेल्या निर्णयामुळे गोंदिया बंद करण्याचे टाळले व अटकेच्या निषेधार्थ रॅली काढण्याचे   ठरविण्यात  आले होते. त्यामुळे आज भाजप जिल्हा कार्यालयातून आमदार राजकुमार बडोले यांच्या नेतृत्वाखाली रॅली काढण्यात आली.
शहर पोलीस ठाण्यात अटकेची प्रक्रिया केल्यानंतर रॅलीने पोलीस प्रशासन व शासनाच्या धोरणाविरोधात घोषणा देत शहर भ्रमण करत उपविभागीय कार्यालयावर निषेध मोर्चा काढण्यात आला.
दरम्यान, भाजपच्या आदिवासी आघाडीचे प्रदेशाध्यक्ष माजी आमदार अशोक नेते, आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार केशव मानकर, भेरसिंग नागपूरे, अशोक इंगळे, शहर अध्यक्ष दीपक कदम यांच्या शिष्टमंडळाने उपविभागीय अधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन देत शिवीगाळ केल्याची खोटी तक्रार दाखल करणाऱ्या सीईओ डॉ.गेडाम यांच्यावर त्यांनी नोकरभरतीत केलेल्या भ्रष्टाचाराची कारवाई करून त्यांच्या संपत्तीची सेवानिवृत्त न्यायाधीशांकडून चौकशी करण्याची मागणी केली. जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांसह जि.प.पदाधिकारी व सदस्यांवर लावण्यात आलेले अनुसूचित जाती-जमाती प्रतिबंधक कलम परत घेण्याच्या मागणीचे निवेदन दिले, तसेच या आशयाचे निवेदन विधानसभा विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, भाजप प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार,  विनोद तावडे व देवेन्द्र फडणवीस   यांनाही पक्षातर्फे पाठविण्यात येणार असल्याची माहिती अशोक नेते यांनी दिली.     
तपास न करताच
कारवाई -आ.बडोले
या साऱ्या प्रकरणात पोलिस अधिकाऱ्यांनी तपास बरोबर न करता राजकीय दबावामुळे जि.प.अध्यक्ष, उपाध्यक्षांना अटक केल्याचा आरोप आमदार राजकुमार बडोले यांनी पत्रकार परिषदेतून केला आहे. शासकीय विश्रामगृहात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आमदार राजकुमार बडोले, माजी आमदार मधुकर कुकडे, भेरसिंग नागपूरे, भाजप महिला अध्यक्ष रचना गहाणे, सीता रहांगडाले, अशोक इंगळे, तारीक कुरैशी, रमेश ताराम उपस्थित होते.

Story img Loader