गणित या विषयाचा धसका भलेभले घेतात. महानगरपालिका शाळेतील विद्यार्थ्यांनाही या विषयाची भीती वाटतेच. पण आता त्यांचेच शाळासोबती त्यांना गणित शिकवत आहेत. पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना विविध प्रयोगांमधून काही वर्षांपूर्वी गणिताचे धडे दिल्यानंतर आता त्यांच्याचकडून नव्या विद्यार्थ्यांना या विषयाकडे वळवण्याची कामगिरी नवनिर्मिती ही संस्था करत आहे. या उपक्रमातून पालिकेच्या तीन शाळांमध्ये ही कार्यशाळा घेतली जात आहे.
वास्तवात गणित हा आपल्या जन्मापासून सोबती असतो आणि आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमधून त्याच्याशी नियमित परिचय होतो, मात्र हे समजून न घेता फक्त पुस्तकी गणित पाहिल्याने अनेकांना या विषयाची नावड निर्माण होते. गणिताची भीती मनातून काढण्यासाठी त्याचा परिचय दैनंदिन आयुष्यातून होणे गरजेचे असते. नवनिर्मिती ही संस्था पालिका शाळेतील विद्यार्थ्यांच्या गणित या विषयाबाबत गेली काही वष्रे काम करत आहे. शैक्षणिक साहित्य, शिक्षकांना प्रशिक्षण अशा पद्धतीने काम सुरू झाले, मात्र मनपाच्या शाळांमध्ये साहित्याची बिलकूल कमी नसल्याचे लक्षात आले. शिक्षकांवर अभ्यासक्रम पूर्ण करण्याचा बोजा असतो. त्यामुळे संस्थेने थेट विद्यार्थ्यांनाच गणिताशी मत्री करण्यास सोबत करण्याचे ठरवले. याच संकल्पनेतून गणिती कार्यशाळांची सुरुवात झाली. नेहमीच्या अभ्यासक्रमात इतरांशी बरोबरी करू न शकणारी, बुजलेली, गणिताशी मत्री करू न शकणाऱ्या मुलांना या कार्यशाळेत सहभागी करून घेतले जाते. त्यांना प्रशिक्षण देणारी मुले ही पालिका शाळांमध्येच शिकून मोठी झाली आहेत. महाविद्यालयात शिकणारी, विविध क्षेत्रांत काम करणाऱ्या या तरुणांना नवनिर्मितीनेच शिक्षणाचे आधुनिक धडे दिले आहेत. आता मुलांना कसे शिकवायचे त्याचे प्रशिक्षण घेऊन तयार झालेली ही पिढी पुढच्या पिढीतल्या मुलांना गणिताला आपलेसे करायला मदत करेल.
बाजारपेठ, खेळ, हस्तकला आदी विषयांतून गणिताची ओळख करून देण्याचा प्रयत्न या दोन दिवसांच्या कार्यशाळांमधून होत आहे. पहिली कार्यशाळा कांजुरमार्ग पश्चिम येथील परेल डॉकयार्ड या शाळेत ९ आणि १० फेब्रुवारी रोजी घेतली गेली. दुसरी कार्यशाळा २० व २१ फेब्रुवारी रोजी पवई पाचपोली येथे, तर तिसरी कार्यशाळा किरणदास मनपा शाळेत घेतली जाईल. या कार्यशाळेतून विविध भाषा माध्यमाच्या २० शाळेच्या पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना गणिताकडे जाण्याची वाट दाखवण्यात येईल. दोन दिवसांमध्ये गणिताची पूर्ण माहिती देता येत नाही. मात्र गणित या विषयाची आपल्या दैनंदिन आयुष्याशी सांगड घालून त्याच्याभोवतीचे गूढतेचे वलय कमी केले जाते. एकदा गणित ओळखीचे वाटायला लागले की मुले ते आपोआप शिकू लागतात. नवनिर्मितीकडून अशा प्रकारे गणितासंबंधी सातत्याने प्रयत्न केले जातात, असे नवनिर्मितीचे सदस्य डॉ. नंदकुमार जाधव म्हणाले.

Story img Loader