कर्जत तालुका शेतकरी संघटनेने उसाच्या दरासाठी आज राशीन येथील अंबालिका साखर कारखान्याच्या ५० बैलगाडय़ा व काही ट्रेलरची हवा सोडून देत आंदोलन केले व पोलिसांच्या मदतीने आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कारखान्याच्या व्यवस्थापकाला चपराक दिली.
तालुक्यातील एकमेव असणारा अंबालिका कारखाना अजित पवार यांच्या नावावर नाही, मात्र त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हा कारखाना सुरू आहे. या कारखान्यावर आज शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष लालासाहेब सुद्रिक, तालुकाध्यक्ष शिवाजी सुद्रिक, सिद्धटेकचे उपसरपंच रमेश पवार यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. कारखान्याच्या व्यवस्थापनाने राजकीय दबावतंत्र वापरून तालुक्यात आंदोलन सुरू होण्याआधीच मोडून काढण्याचा डाव आखला होता, मात्र संघटनेने आंदोलन यशस्वी केले.
बंदोबस्तासाठी पोलीस व कारखान्याचे सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते. आंदोलनासाठी तालुक्यातील कुळधरण, कोपर्डी, भांबोरा, दुधोडी व सिध्दटेक परिसरातील शेतकरी व संघटनेचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने जमले होते. पोलिसांनी त्यांना कारखान्याच्या अलिकडेच अडवले. या कार्यकर्त्यांनी तेथेच चार तास थांबून घोषणा दिल्या. नंतर व्यवस्थापनाशी चर्चा झाली. परंतु त्यात कोणताच तोडगा न निघाल्याने संतप्त आंदोलकांनी कारखान्याकडे येत असलेल्या ५० बैलगाडय़ा व काही ट्रेलरची हवा सोडून देत त्या रस्त्यावरच थांबतील याची काळजी घेतली. भाव जाहीर होत नाही तोपर्यंत कारखाना बंद ठेवावा, अन्यथा पुन्हा असेच आंदोलन करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.      

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा