पावसाळ्यात रस्त्यांवर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी वापरलेल्या दगड पावडरीमुळे सध्या ऐन दिवाळीच्या तोंडावर अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये अक्षरश: धुळवड अवतरली असून त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
मुंबई महानगर प्रदेश परिसरातील महत्त्वाची शहरे असणाऱ्या अंबरनाथ आणि बदलापूरमध्ये नागरी सुविधा पुरविण्यात स्थानिक पालिका प्रशासन यंत्रणा सपशेल अपयशी ठरल्या असून लोकप्रतिनिधी मात्र कुरघोडीचे राजकारण करण्यात मग्न आहेत. यंदा पावसाळ्यात या दोन्ही शहरांमधील बहुतेक सर्व रस्ते पूर्णत: उखडले होते. गणेशोत्सव काळात त्याची तकलादू डागडुजी करण्यात आली. मात्र आता पावसाळा संपताच खड्डे बुजविण्यासाठी वापरलेली दगड पावडर उधळून नागरिकांच्या नाका-तोंडात जाऊ लागली आहे. बदलापूर पालिकेने अभियंता संघटनेला दिलेल्या पत्रात रस्त्यांची डागडुजी ३१ डिसेंबरपूर्वी पूर्ण होणे शक्य नाही, असे नमूद केले आहे. त्यामुळे यंदा बदलापूरकरांना धुळीचा सामना करीतच दिवाळी साजरी करावी लागणार आहे. त्याचा निषेध म्हणून संघटनेचे अध्यक्ष संभाजी शिंदे १ नोव्हेंबर रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करणार आहेत. अंबरनाथमध्येही तशीच परिस्थिती आहे. शहरातील बहुतेक सर्वच रस्त्यांवर धूळ आणि खड्डय़ांचे साम्राज्य आहे. एमएमआरडीएच्या वतीने सध्या डोंबिवली ते बदलापूर रस्त्याचे काम सुरू आहे. त्यामुळे त्या मार्गातही अडथळे आहेत. कल्याण-बदलापूर रस्त्याचे काम अंबरनाथमधील अनधिकृत गाळेधारकांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नावरून अडले आहे. पालकमंत्र्यांनी या कामास स्थगिती दिली, पण त्यातून मार्ग काढला नाही. परिणामी या रस्त्याची दिवसेंदिवस अतिशय वाईट अवस्था होत आहे. सध्या मोठय़ा खड्डय़ांमध्ये खडी भरण्याची कामे कंत्राटदाराकडून सुरू आहेत. मात्र वाहनांमुळे ही खडी उडून नागरिक जखमी होण्याचे प्रकार घडत आहेत.
श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ
रस्त्यांवरील या धुळवडीमुळे श्वसनाच्या विकारांमध्ये वाढ झाली आहे. लहान मुले आणि वृद्धांना त्याचा अधिक त्रास होतो. या धुळीमुळे खोकल्याचा अधिक प्रादुर्भाव आहे. विशेषत: अस्थमा असणाऱ्या रुग्णांना त्याचा अधिक त्रास जाणवतो. त्याचप्रमाणे श्वसनदाहची (न्यूमोनिया) समस्या भेडसावते. वाहनचालकांना विशेषत: रिक्षा आणि दुचाकीस्वारांना पाठदुखीचा त्रास होतो.   
ल्ल  डॉ. समीर कुलकर्णी, अंबरनाथ

Story img Loader