दलितांना प्रत्येक प्रश्नांवर अनेक वर्षे झुंजायला लावण्याचे दृष्ट राजकारण मोडून काढण्यासाठी आंबेडकरी समाजाने महाराष्ट्रात सत्तांतर घडवून भीमशक्तीची ताकद दाखवून द्यावी, असे आवाहन राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या वतीने सातपूर टाऊन पोलीस चौकीसमोर मराठवाडा विद्यापीठ नामांतर वर्धापन दिनानिमित्ताने आयोजित जाहीर सभेत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी केले.
अध्यक्षस्थानी जिल्हाप्रमुख नारायण गायकवाड होते. कटारे यांनी मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी १६ वर्षे लावली. आता इंदू मिलच्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक उभारण्यासाठी सरकार २० वर्षांनी येणाऱ्या धम्मक्रांतीच्या अमृत महोत्सवापर्यंत वाट पाहण्यास लावणार काय, असा सवाल केला. तब्बल १६ वर्ष नामांतर लढय़ासाठी घालवावी लागली. मराठवाडय़ात नामांतर विरोधी दंगलीत अनेक आंबेडकरी नागरिकांना बलिदान द्यावे लागले. तुटपुंज्या संसाराची राखरांगोळी झाली. भावनिक प्रश्न आणि प्रतिकात्मक लढय़ांवर सर्व भर दिल्याने दलितांविषयी अप्रियतेची भावना वाढीस लागून रिपब्लिकन पक्षाचे राजकीय नुकसान होत आहे, असे त्यांनी सांगितले. उत्तर प्रदेशात बहुजन समाज पक्षाची सत्ता स्वबळावर आणणाऱ्या मायावती यांनीही प्रतिकात्मक स्मारकांवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे त्यांना सत्ता गमवावी लागली असेही कटारे यांनी निरीक्षण नोंदविले.

Story img Loader