भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या शुक्रवारच्या नागपूर भेटीकडे विविधांगी दृष्टीकोनातून पाहिले जात आहे. भाजपात मोठी जबाबदारी अंगावर पडल्यानंतर ती व्यक्ती सरसंघचालकांच्या भेटीला नागपुरात मुख्यालयी येते, हा आजवरचा पायंडा कुणीही मोडलेला नाही. मात्र, गेल्या काही दिवसांमध्ये शिवसेना आणि भाजपमध्ये ‘एकला चलो रे’चा जो घोषा सुरू आहे. त्या पाश्र्वभूमीवर त्यांच्या या भेटीकडे विशेष लक्ष आहे. अमित शहा सरसंघचालकांच्या भेटीतून नेमके काय साध्य करणार, यावरही कालपासूनच चर्चेच्या फैरी झडत आहेत.
विधानसभा निवडणुका अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपल्या आहेत आणि काही दिवसांपूर्वीच शिवसेना आणि भाजपातील काही पदाधिकाऱ्यांनी ‘एकला चलो रे’ची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. त्यामुळे महायुतीतील या कुरबुरीवर सरसंघचालकांच्या भेटीत काही चर्चा होणार का, या दृष्टीकोनातून या भेटीकडे पाहिले जात आहे. विदर्भात भाजपचा गड मजबूत आहे आणि त्या तुलनेत शिवसेनेचा विशेष पुळका नाही. प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे असेपर्यंत शिवसेनेशी भाजपचे बंध अधिक घट्ट होते. आताही ते घट्टच आहेत, पण भाजपचे महाजन आणि मुंडे आणि शिवसेनेचे बाळासाहेब ठाकरे यांच्या जाण्याने यात फरक जरूर पडला आहे. राज्यात आणि केंद्रात विदर्भातील भाजपचे दोन खंदे नेतृत्त्व कार्यरत आहे. त्यांची भूमिका स्वतंत्र विदर्भाच्याच बाजूने राहिलेली आहे. विदर्भाच्या मुद्यावर हे दोन्ही नेते आक्रमक आहेत. त्याच वेळी शिवसेना मात्र स्वतंत्र विदर्भाच्या विरोधात आहे. सेना आणि भाजपची युती राज्य किंवा देशातील इतर युतींसारखी नाही. त्यामुळे ती लवकर कोलमडून पडेल, असेही नाही. तरीही गेल्या काही दिवसात दोन्ही पक्ष पदाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका आणि त्यावरून एकूणच उद्भवलेली परिस्थिती यामुळेही अमित शहांच्या या नागपूर भेटीकडे पाहिले जात आहे.
शहांचा हा दौरा अतिशय व्यग्र असला तरीही भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ते जेवण घेणार आहेत. त्यामुळे फडणवीसांच्या घरात अमित शहांच्या आवडीनिवडी काय, यावरून मेन्यू तयार केला जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अमित शहांना वैदर्भीय भोजनाची मेजवानी देण्यात येणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा