महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेत तंटामुक्त झालेल्या सर्व गावांना लोकसंख्येच्या आधारावर पुरस्कार दिला जातो. रोख रक्कम व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मोहिमेच्या पाचव्या वर्षांत राज्यातील २७१२ गावांनी हे पुरस्कार प्राप्त केले. राज्य शासनाकडून तंटामुक्त झालेल्या गावांची घोषणा केली जाते. गावातील लोकसंख्येच्या आधारावर शासनाने पुरस्काराची रक्कम निश्चित केलेली आहे.
तंटामुक्त गावाची लोकसंख्या एक हजारापर्यंत असल्यास त्या गावाला एक लाख रुपयांचा पुरस्कार दिला जातो. तंटामुक्त गावाची लोकसंख्या १००१ ते २००० पर्यंत असल्यास दोन लाख रुपये, २००१ ते ३००० पर्यंतची लोकसंख्या असणाऱ्या गावाला तीन लाख रुपये, ३००१ ते ४००० पर्यंत लोकसंख्या असल्यास चार लाख, ४००१ ते ५००० पर्यंतची लोकसंख्या असणाऱ्या गावास पाच लाख रुपये, ५००१ ते १०,००० पर्यंतची लोकसंख्या असल्यास सात लाख आणि दहा हजारहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावाला दहा लाख रुपयांचा निधी पुरस्काराच्या स्वरूपात दिला जातो.
या मोहिमेत या पुरस्काराबरोबर १९० हून अधिक गुण मिळविणाऱ्या गावांना त्यांना मिळणाऱ्या पुरस्काराशिवाय मिळालेल्या पुरस्कार रकमेच्या २५ टक्के इतकी रक्कम विशिष्ट सन्मानचिन्हासह विशेष व शांतता पुरस्कार म्हणून दिली जाते. पाचव्या वर्षांत राज्यातील ७५ गावांनी हा पुरस्कार मिळविला. या मोहिमेत आधीच्या वर्षांत तंटामुक्त गाव पुरस्कार मिळविला असल्यास त्या गावास पुन्हा पुरस्कार दिला जात नाही. तथापि, अशा गावांनी पुढील वर्षांत तंटा मिटविण्यात सातत्य राखल्यास विशेष पुरस्कार देण्याबाबत राज्यस्तरीय समिती विचार करून निर्णय घेते. या माध्यमातून मिळणारा निधी ग्रामपंचायतीला वेगवेगळ्या कामांसाठी वापरता येतो. आपापसातील तंटे मिटविणे आणि नव्याने तंटे निर्माण होऊ नये याकरिता प्रतिबंधात्मक उपाय योजून ग्रामीण भागात शांततेचे वातावरण निर्माण करणे, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. हा उद्देश साध्य करणाऱ्या गावांना अर्थात तंटामुक्त गाव म्हणून निवड होणाऱ्या गावांना विकासकामांसाठी शासनाने निधीची तजवीज केली आहे.
गावातील शांततेचे वातावरण विकास प्रक्रियेला पोषक ठरत असते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने ग्रामीण भागातील तंटे-बखेडय़ांचे प्रमाण कमी करण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त गाव अभियान सुरू केले आहे. या माध्यमातून स्थानिक पातळीवरील तंटे सामोपचाराने मिटविणे आणि विविध स्वरूपाचे उपक्रम राबवून ग्रामीण भागाच्या विकासाला चालना देण्याचा प्रयत्न होत आहे. या अभियानातील एकूणच कामगिरीचा वेध लेखमालेतून घेण्यात येत आहे. मालेतील ४४वा लेख.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा