गौतम राजाध्यक्ष यांनी एकदा सहज मला सांगितलं होतं की, ‘तू या मॉडेलिंग क्षेत्रात ये’. त्यावर मीच त्यांना प्रतिप्रश्न केला, ‘लोक मला जाहिरातीत का घेतील?’ त्यावर त्यांनी उत्तर दिलं होतं, आधी ये तर या क्षेत्रात मग कळेल लोक तुला का घेतील ते.. मला जाहिरातीची पहिली ऑफर आल्यावर मी त्यांना फोन करून विचारलं हे मी करू का? त्यावर क्षणाचाही विलंब न करता ते उत्तरले होते, आत्ता कळलं लोक तुला का घेतील ते..
माझी पहिली जाहिरात होती ती आयसीआयसीआय बॅंकेची. हे कॅम्पेन खूपच मोठं होतं पण, मला या क्षेत्रात खरी ओळख मिळवून दिली ती ‘पिडीयाशुअर’ आणि सलमान खान सोबत केलेल्या ‘टायगर’ बिस्किटच्या जाहिरातीने. जाहिरातींमुळे सलमान, आमिर खान, सचिन तेंडुलकर अशा नावाजलेल्या मंडळींबरोबर काम करायची संधी मला मिळाली. या सगळ्या मोठय़ा सेलिब्रिटीजबरोबर काम करताना अजिबात दडपण आलं नाही. उलट या मंडळींनीच मला सहजगत्या सामावून घेतले. आमिर खानला भेटले, त्यावेळी त्यांनी मी काय करते या सर्व गोष्टींची माहिती मिळवली होती. ‘उजाला’च्या जाहिराती वेळी सचिन खूपच लाजाळू असल्यामुळे त्यांच्याशी फार काही बोलणं झालं नाही. पण, या लोकांना भेटून तुम्ही स्वत:सुद्धा घडत असता.
जाहिरातीच्या माध्यमातून अनेक आंतरराष्ट्रीय दिग्दर्शकांबरोबरही काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याबरोबर काम करताना तुम्हाला खूप स्वातंत्र्य दिलं जातं. जाहिरात क्षेत्रात प्रत्येकाला काय करायचं आहे हे माहीत आहे. त्यामुळे चित्रिकरणाच्या दिवसात खूप शिकायला मिळतं. खूप तपशीलात जाऊन एखाद्या प्रॉडक्टचा अभ्यास केला जातो. खूप साध्या गोष्टी असतात की, साबण पकडायचा कसा इथपासून ते त्यावर किती प्रकाशझोत पडायला हवा अशा अनेक गोष्टींचा विचार जाहिरात करताना केला जातो. एका दिवसात होणाऱ्या चित्रिकरणामध्ये केवळ एका मिनिटांची जाहिरात करायची असते. त्यामुळे तुमचं वेळेचं व्यवस्थापनही महत्त्वाचं ठरतं आणि कमीत कमी वेळात तुम्हाला खूप माहिती घ्यायची असते. ‘जॉनसन्स’च्या जाहिरातीमध्ये बाळाबरोबर असलेलं बॉंडिंग टीव्हीवर प्रत्यक्षात दिसावं म्हणून बाळासोबत खूप छान टय़ुनिंग जमवावं लागलं होतं. त्यावेळी मला माझ्या मुलांच्या बाबतीत आलेला अनुभव कामी आला होता. त्या जाहिरातीतील मुलगा खूप हट्टी होता. काही केल्या तो ऐकतच नव्हता. त्यावेळी त्याच्याशी माझ्या तंत्राने संवाद साधायला सुरूवात केली आणि संध्याकाळपर्यंत आम्हाला हवे तसे शॉट्सही त्या जॉन्सनच्या जाहिरातीसाठी मिळाले होते. पण, मी त्या हट्टी मुलाबरोबर कसं जमवून घेतलं या विचाराने आमच्या दिग्दर्शिका मात्र अवाक् झाली होती.  एखादी जाहिरात जर आईची असेल तर त्या भूमिकेसाठी मी खूप तरूण दिसते असं अनेक दिग्दर्शकांचं मत आहे. हे विधान मी चांगल्या अर्थाने घेत असले तरी आजही माझ्या बाबतीत असं होतं की केवळ या कारणामुळे ऑडिशनला आग्रहाने बोलवूनही शेवटी माझ्या हातात नकार उरतो. त्यातही मी निवडक कामे करते. प्रत्येक ऑडिशनला जात नाही. माझ्या मते या क्षेत्रात पैसा उत्तम आहे पण, तुम्ही कु ठल्या प्रॉडक्शन हाऊसबरोबर जाहिरात करता हे तुम्हाला लक्षात ठेवावं लागतं. आणि दुसरं म्हणजे तुमची निवड ही बऱ्याच अंशी जाहिरात करणाऱ्यांच्या डोक्यात काय आहे यावर अवलंबून असते.
प्रचितीचा सल्ला
तुम्हाला कशा व कुठल्या पद्धतीचं काम करायचं आहे हे तुम्हीच निवडा. तुमची पात्रता ही केवळ तुमच्या हातात आहे व ती टिकवणं गरजेचं आहे. तुमच्या मर्यादा तुम्हाला माहीत असायला हव्यात. त्याचबरोबर तुम्हाला काय सूट होतं हेही तुम्हाला माहीत असायला हवं.

प्रचितीच्या गाजलेल्या जाहिराती
ब्रिटानिया टायगर बिस्किट, जॉनसन्स बेबी सोप अ‍ॅन्ड पावडर, मॉर्टिन नेचरगार्ड, पिडीयाशुअर, उजाला, टाटा स्काय, थॉमस कुक, आयसीआयसीआय बॅंक होम लोन्स

Story img Loader