ऐन दिवाळीत नगर शहराला पाणीटंचाईला तोंड द्यावे लागण्याची शक्यता आहे. शहर पाणीपुरवठा योजनेतील विळद उपसा केंद्रातील ३०० अश्वशक्तीच्या वीजपंपात बिघाड झाल्याने, शहराच्या पाणीपुरवठय़ावर परिणाम होणार आहे. वीजपंपाच्या दुरुस्तीचे काम महापालिकेने तातडीने हाती घेतले आहे, मात्र दुरुस्तीस अवधी लागणार आहे.
शहराच्या अनेक भागांस एकदिवसाड पाणीपुरवठा होतो. परंतु दिवाळीनिमित्त शनिवारपासून (दि. २) मंगळवापर्यंत (दि. ५) रोज पाणीवाटप करण्याचे मनपाने जाहीर केले होते. मनपाने ही भूमिका जाहीर केली आणि लगेच दुसऱ्या दिवशी शनिवारी मध्यरात्री पाणी योजनेतील विळद येथील उपसा केंद्रातील ३०० अश्वशक्तीच्या वीजपंपात बिघाड झाला. त्याच्या दुरुस्तीचे काम मनपाने लगेचच हाती घेतले असले तरी दुरुस्तीस अवधी लागणार आहे.
या परिस्थितीमुळे विळद उपसा केंद्रातील नियमित पाणीउपशावर परिणाम झालेला आहे. मागणीच्या प्रमाणात पुरवठा होऊ शकणार नसल्याने नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन मनपाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे केले आहे. ऐन दिवाळीत कमी प्रमाणात पाणीपुरवठा होणार असल्याने नागरिकांना चांगलीच गैरसोय सहन करावी लागणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा