लहानपणापासूनच मुलांमध्ये चांगले संस्कार जोपासावे लागतात. तरच उत्तम नागरिक देशाला लाभतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची बिजे रोवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियान’ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी ‘कळसूत्री बाहुल्यां’चा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी ज्येष्ठ अभिनेत्री मीना नाईक यांच्या ‘कळसूत्री’ या संस्थेने एक पाऊल पुढे टाकले आहे.
गेली अनेक वर्षे लहान मुले आणि विद्यार्थी यांच्यासाठी काम करीत असल्याने त्यांच्यामध्ये स्वच्छतेची आवाज रुजविण्यासाठी या अभियानात सहभागी होण्याची विनंती संगीत नाटक अकादमीकडून आपल्याला करण्यात आली. त्यास मान देऊन आमची ‘कळसूत्री’ संस्था स्वच्छता अभियानाच्या प्रसारासाठी हा कार्यक्रम विनामूल्य सादर करत असल्याची माहिती नाईक यांनी ‘वृत्तान्त’ला दिली.
चांगल्या सवयी लहान वयातच जोपासाव्या लागतात. त्यामुळे आमचा मुख्य प्रेक्षक हा शालेय विद्यार्थी आहे. मात्र असे जरी असले तरी ‘सुशिक्षित’ असलेल्या मोठय़ा माणसांपुढेही आम्ही हा कार्यक्रम करीत असल्याचे सांगून नाईक म्हणाल्या, खासगी आणि महापालिका शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी आम्ही हा कार्यक्रम करीत आहोत. हा कार्यक्रम वीस मिनिटांचा असून गोष्टीच्या माध्यमातून आणि उपस्थित विद्यार्थी, प्रेक्षकोंशी संवाद साधत हा कार्यक्रम पुढे जातो. विद्यार्थी आणि मुलांशी संवाद साधल्यामुळे ते ही मोकळेपणाने बोलतात, प्रश्न विचारतात, असे त्या म्हणाल्या.
पाचव्या इयत्तेत शिकणारा एक लहान मुलगा आणि त्याचा मित्र ‘क्लिन’ अशा दोघांच्या संवादातून गोष्ट पुढे जाते. गोष्टीत अन्य काही प्रसंग, व पात्रे असून शेवटी त्या लहान मुलाला स्वच्छतेचे महत्त्व कसे पटते आणि तो इतरांना याचे महत्त्व कसे पटवून द्यायला सुरुवात करतो, हे यातून मांडण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. महापालिका शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलेली आणि आता महाविद्यालयत शिकणारे संकेत गुरव, प्रियांका कोतवाल, राहुल काळे, अभिषेक वाघमारे हे विद्यार्थी हा कळसुत्री बाहुल्यांचा कार्यक्रम सादर करीत आहेत. स्वच्छतेची सुरुवात प्रत्येकाने स्वत:पासून करावी. आपले घर, परिसर आणि सार्वजनिक ठिकाणे स्वच्छ ठेवावीत, तेथे कचरा करू नये, थुंकणे, रस्त्यावर मल-मुत्र विसर्जन करणे टाळावे, उघडय़ावरील अस्वच्छ पदार्थ खाऊ नयेत आणि विकतही घेऊ नयेत, याचे महत्त्व या छोटय़ाशा कार्यक्रमातून पटवून देण्याचा आम्ही प्रयत्न करत असल्याचेही मीना नाईक यांनी सांगितले.
स्वच्छतेसाठी ‘कळसूत्री’चे एक पाऊल पुढे
लहानपणापासूनच मुलांमध्ये चांगले संस्कार जोपासावे लागतात. तरच उत्तम नागरिक देशाला लाभतात. ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची बिजे रोवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘स्वच्छ भारत अभियान’ विद्यार्थ्यांच्या माध्यमातून यशस्वी करण्यासाठी ‘कळसूत्री बाहुल्यां’चा वापर करण्यात येणार आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
First published on: 30-10-2014 at 06:19 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An initiative to support swachh bharat abhiyan