मुंबईपासून शेकडो कोस दूर असलेल्या अमरावतीसारख्या शहरातून किरण शरद आणि प्रवीण मंगल हे दोघे मुंबईत आले. विविध डान्स रिअॅलिटी शोमधून आपली प्रतिभा सिद्ध करत हे दोघेही आता बॉलीवूड प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत. ‘शूद्र – द रायझिंग’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले. ‘शूद्र – द रायझिंग’च्या निमित्ताने या दोघांनी ‘रविवार वृत्तान्त’शी मनमोकळ्या गप्पा मारल्या..
एखाद्या छोटय़ा शहरातून मुंबईत येऊन या हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणे किती अवघड असते, हे शाहरूख खानला विचारा! कोणताही आगापिछा नसताना, कोणतीही ओळख नसताना शाहरूखने हिंदी चित्रपटसृष्टीत ‘किंग खान’ हा किताब मिळवला आहे. शाहरूखची ही यशोगाथा आठवण्याचे कारण म्हणजे सध्या ‘शूद्र’ या चित्रपटाच्या निमित्ताने गाजत असलेल्या किरण आणि प्रवीण या दोघांची पाश्र्वभूमी!
किरण शरद आणि प्रवीण मंगल हे दोघेही मूळ अमरावतीचे राहणारे. अमरावतीमध्येच लहानाचे मोठे झालेले. या दोघांनी पहिले पुणे आणि त्यानंतर मुंबई असे टप्पे गाठत आता बॉलीवूडचे दरवाजे ठोठावले आहेत. यातील किरण ही उत्तम नर्तिका व अभिनेत्री, तर प्रवीणला अभिनयाची चांगली जाण! या दोघांनी अमरावतीमध्ये रंगभूमीवर कामही केले आहे. अमरावतीमध्ये सुरू असलेल्या प्रायोगिक नाटय़चळवळीतील हे दोघेही नावाजलेले नट! त्यामुळे दोघांचेही टय़ूनिंग उत्तमच.
या टय़ूनिंगचा प्रत्यय सर्वप्रथम आला तो स्टार टीव्हीवरील ‘आजा माही वे’ या डान्स रिअॅलिटी शोमधून. हा शो जोडप्यासाठी असल्याचे लक्षात आल्यानंतर किरणने प्रवीणला अक्षरश: खेचत नेले. या शोच्या ऑडिशनसाठी दोघांनी ‘कोंबडी पळाली’ या गाण्यावर नाच केला होता. ‘त्या वेळी मी काय नाचलो ते माझे मलाच माहीत. किरण मला स्टेजवरच, ‘असं नाही, तसं नाही’ वगैरे सांगत होती आणि मी माझ्या मर्जीने नाचत होतो. आमचा संवाद म्हणजे परीक्षकांना आमच्यातली केमिस्ट्री वाटली आणि आमची निवड झाली,’ अशी आठवण प्रवीण सांगतो. मात्र त्यानंतर प्रवीणने नाचण्याची तालीम अक्षरश: बारा-बारा तास केली. विशेष म्हणजे या शोमध्ये या जोडीने अंतिम फेरी जिंकली. किरणने याआधी ‘बुगी वुगी’ हा शोदेखील तीन वर्षे जिंकला होता. त्या वेळी ती लहान होती. मात्र आपल्याला खूपच चांगल्या प्रकारे त्या अनुभवाचा उपयोग झाल्याचे किरण आवर्जून नमूद करते.
‘शूद्र – द रायझिंग’ या चित्रपटाचीही अशीच गंमत असल्याचे दोघे सांगतात. या चित्रपटात प्रवीणने साकारलेली भूमिका दुसराच अभिनेता साकारणार होता. मात्र किरणच्या ऑडिशनच्या वेळी तो अभिनेता न आल्याने किरणने खूप मिन्नतवाऱ्या करून प्रवीणला बोलावले. त्या दोघांनी ते दृश्य साकारले. त्या वेळी तिथे उपस्थित असलेले निर्माते आणि दिग्दर्शक यांना या दोघांनी करून दाखवलेला प्रवेश एवढा भावला की, किरणबरोबर प्रवीणचीही निवड या चित्रपटातील मुख्य पात्रासाठी झाली.
या चित्रपटाचे चित्रीकरण मध्य प्रदेशात निर्मात्याच्या मोठय़ा फार्म हाऊसवर झाले. हे फार्म हाऊस वस्तीपासून बरेच लांब असल्याने तेथे कोणत्याही अडथळ्याविना सर्व चित्रीकरण पार पडल्याचेही किरण आणि प्रवीण सांगतात. निर्मात्याने आणि दिग्दर्शकाने खूप मोकळीक दिल्याने आम्हालाही काम करताना खूप मजा आली, असे दोघांनी स्पष्ट केले. यापुढेही किरण आणि प्रवीण एक सोडून दोन दोन चित्रपटांमध्ये एकत्र दिसणार आहेत.
यात एका मराठी चित्रपटाचाही समावेश आहे. ‘आकांक्षा’ असे या चित्रपटाचे नाव असून किरणचा भाऊ वैभव कोरडे या चित्रपटाचा निर्माता आहे. त्याचप्रमाणे बंगाली दिग्दर्शक रणजीत राणा या चित्रपटाद्वारे पहिल्यांदाच मराठी चित्रपटसृष्टीत पाऊल ठेवणार आहे. त्याशिवाय ‘जर्नी’ या हिंदी चित्रपटातही किरण आणि प्रवीण एकत्र दिसतील. हा चित्रपट फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होण्याची शक्यता आहे, असे प्रवीणने सांगितले.
किरण और प्रवीण की जोडी अजीब..
मुंबईपासून शेकडो कोस दूर असलेल्या अमरावतीसारख्या शहरातून किरण शरद आणि प्रवीण मंगल हे दोघे मुंबईत आले. विविध डान्स रिअॅलिटी शोमधून आपली प्रतिभा सिद्ध करत हे दोघेही आता बॉलीवूड प्रवेशासाठी सज्ज झाले आहेत. ‘शूद्र - द रायझिंग’ या त्यांच्या पहिल्याच चित्रपटात त्यांच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले.
आणखी वाचा
First published on: 25-11-2012 at 12:17 IST
मराठीतील सर्व रविवार वृत्तांन्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: An interview with actor of film sudra the rising kiran sharad and praveen mangal