शिवसेनेशी केलेल्या बंडखोरीनंतर कल्याण पूर्वेत अपक्ष आमदार गणपत गायकवाड यांच्या पाठीपुढे करत नवा घरोबा निर्माण करणाऱ्या आनंद परांजपे यांना ऐन लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत गणपतरावांनी ठेंगा दाखविल्याने राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असून कल्याण लोकसभा मतदारसंघातील राजकीय समिकरणे यामुळे झपाटय़ाने बदलू लागली आहेत. राष्ट्रवादीत येताच परांजपे यांना ठाण्यात जितेंद्र आव्हाड, तर कल्याणात गणपत गायकवाड यांची साथ लाभली. गणपतराव तसे अपक्ष आमदार. मात्र, राष्ट्रवादीशी त्यांची जवळीक असल्याने परांजपे सतत त्यांच्या पुढेमागे दिसायचे. याच गणपतरावांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर परांजपे यांना कात्रजचा घाट दाखविला असून आमदार महाशयांच्या या ‘यू टर्न’मुळे राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढली आहे.
शिवसेनेतून फुटल्यानंतर परांजपे सतत पोलीस बंदोबस्तात िहडत असत. बंदोबस्त असला तरी संतापलेला शिवसैनिक कधी-कुठून अंगावर येईल, याचा पत्ता नसायचा. त्यामुळे ठाण्यात आव्हाडांच्या सावलीत वावरणारे परांजपे कल्याणमध्ये येताच कल्याण पूर्वेतील गणपत गायकवाड यांचे कार्यालय गाठायचे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्याशी थेट संपर्क साधणारे खासदार म्हणून परांजपे यांचे नाव सतत चर्चेत असायचे. त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते, पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासोबत हळूहळू जमवून घेण्यास सुरुवात केली. शिवसेनेला जय महाराष्ट्र केल्यानंतर परांजपे आणि गायकवाड यांचेही सूत उत्तम जुळू लागले. कल्याण पूर्वेत गायकवाड यांची राजकीय हुकमत चालते. त्यांचा केबल व्यवसाय या परिसरात यापूर्वीही चर्चेत राहिला आहे. कल्याणमध्ये आले की परांजपे गायकवडांच्या सुरक्षा व्यवस्थेत फिरायचे.
हा दोस्ताना इतका वाढला की कोणताही कार्यक्रम असो ही जोडी एकत्र दिसायची. लोकसभा निवडणुकीत कळवा-मुंब््रयातून जितेंद्र आव्हाड तर कल्याण पूर्वेतून गणपतरावांची पुरेपूर साथ लाभणार हे तर परांजपे यांनी गृहीतच धरले होते. दोन ते तीन वर्षांच्या काळात गायकवाड आणि परांजपे यांच्यामध्ये ‘अति झाले आणि वाहून गेले’ अशी परिस्थिती हळूहळू निर्माण होत गेली. ज्येष्ठ नेत्यांचा माणूस म्हणून गायकवाड यांनी परांजपे यांना सांभाळले. पुढे मात्र या दोघांमध्ये विसंवाद निर्माण होत गेले. कल्याण पूर्वेत परांजपे यांनी गायकवाड यांच्या राजकीय विरोधकांशी संधान बांधण्यास सुरुवात केली. नेमके तेच गणपतरावांना खटकू लागले. त्यात गणपतरावांचे बंधू अभिमन्यू यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हाध्यक्षपदावरून दूर केल्याने त्यांच्या नाराजीत भर पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश नेते टोकाची भूमिका घेत असताना परांजपे यांची मदत होत नसल्याने गणपतराव अधिकच नाराज झाले. अखेर लोकसभा निवडणुकांचा मुहूर्त साधत त्यांनी बंडाचे शीड उभारले असून ‘परांजपेंना अद्दल घडवू’, असे जाहीर वक्तव्य गणपतराव करू लागल्याने राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढू लागली आहे. गायकवाड गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेच्या संपर्कात असल्याची चर्चा असली तरी शिवसेनेने याविषयी ‘आस्ते कदम’ धोरण स्वीकारले आहे. याच भागातील शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांचे गायकवाड यांच्याशी असलेले राजकीय वैर नेत्यांना ठाऊक आहे. त्यामुळे बंडाच्या पवित्र्यात असलेल्या गणपतरावांना दुरूनच डोळा मारण्याचे उद्योग शिवसेनेने सुरू केले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा