संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने दिले जाणारे कवी अनंत फंदी पुरस्कार साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. संगमनेरमधील शाहीर शिवाजी कांबळे यांना यावर्षीचा ‘कवी अनंत फंदी कलागौरव’ पुरस्कार देण्यात येणार असून राज्यभरातील सहा साहित्यिकांना ‘कवी अनंत फंदी साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. मंडळाचे अध्यक्ष डी. बी. राठी यांनी ही माहिती दिली.
पुरस्कारप्राप्त साहित्य पुढीलप्रमाणे- ‘अनुभूतींच्या स्पंदन रेखा’ या ललित गद्यासाठी अनुराधा ठाकूर (नगर), ‘सम्भवा’ या काव्यसंग्रहासाठी किशोर पाठक (नाशिक), किरण भावसार (सिन्नर) यांना ‘मुळावरची माती सांभाळताना’ या काव्यसंग्रहासाठी, अनिल कांबळी (कणकवली) यांना ‘किलकिल्या उजेडाची तिरीप’ या काव्यसंग्रहासाठी, आनंद हरी (इस्लामपूर) यांना ‘बुमरँग’ या कादंबरीसाठी व दादाजी बागूल यांना ‘एका कार्यकर्त्यांचा आत्मजागर’ या आत्मचरित्रासाठी पुरस्कार देण्यात येणार आहेत.
कवी अनंत फंदी साहित्य पुरस्काराचे हे सातवे वर्ष आहे. गद्य आणि पद्य अशा दोन्ही प्रकारच्या साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो. प्रत्येकी ३ हजार १०० रुपये रोख आणि महावस्त्र, स्मृतीचिन्ह व गौरवपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. यावर्षी पुरस्कारासाठी महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेशातील लेखकांकडून साहित्य आले होते.
त्याचे परीक्षण अॅड. सुनील सराफ, अॅड. रंजना गवांदे, दिनकर साळवे, किरण झंवर, मंजू नावंदर, मुक्ता काशिद आणि महेश झंवर यांनी केल्याची माहिती मंडळाचे कार्याध्यक्ष संतोष खेडलेकर यांनी दिली.
दि. २७ला पुरस्कार वितरण
शहरातील सह्याद्री विद्यालयात दि. २७ जानेवारीला सायंकाळी ४ वाजता ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दिलीप पुंड यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहेत.
अनंत फंदी साहित्य पुरस्कार जाहीर
संगमनेर इतिहास संशोधन मंडळाच्या वतीने दिले जाणारे कवी अनंत फंदी पुरस्कार साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. संगमनेरमधील शाहीर शिवाजी कांबळे यांना यावर्षीचा ‘कवी अनंत फंदी कलागौरव’ पुरस्कार देण्यात येणार असून राज्यभरातील सहा साहित्यिकांना ‘कवी अनंत फंदी साहित्य’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.
आणखी वाचा
First published on: 23-12-2012 at 02:45 IST
मराठीतील सर्व नगर/पश्चिम महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Anant fandi literature award declared