डॉ. कुमुद कानिटकर लिखित ‘अंबरनाथ शिवालय- ए मोनोग्राफ ऑन द टेंपल अ‍ॅट अंबरनाथ’ या इंग्रजी पुस्तकामुळे अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर जगभरात औत्सुक्याचा आणि कुतूहलाचा विषय ठरले असून मुंबई भेटीला येणारे परदेशी पर्यटक आवर्जून हजार वर्षांपूर्वीचे हे वास्तुशिल्प पाहायला येऊ लागले आहेत. मात्र स्थानिक प्रशासन, शासन आणि पुरातत्त्व विभागात समन्वयाचा अभाव असल्याने अतिथिगृह, हॉटेल्स दूर राहिले, साधे धड स्वच्छतागृहसुद्धा मंदिर परिसरात नसल्याने त्यांची अतिशय गैरसोय होत आहे.
शिलाहारकालीन स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे अंबरनाथ येथील शिवमंदिर ९५३ वर्षांपूर्वी बांधण्यात आले. डॉ. कुमुद कानिटकर लिखित पुस्तकामुळे या वास्तूची महती जगाला नव्याने कळली. शैव सिद्धांतातील संकल्पना आणि अंबरनाथ येथील मंदिरावरील शिल्पे यांचा परस्पर संबंध असल्याचे डॉ. कानिटकर यांनी त्यांच्या ग्रंथात स्पष्ट केले आहे.
त्याची नोंद घेत शैव सिद्धांताविषयीच्या पोथ्यांचे संकलन करणाऱ्या ‘फ्रेंच इन्स्टिटय़ूट ऑफ पाँडेचरी’ या संस्थेने त्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला आहे. त्यामुळे पुस्तक वाचून प्रभावित झालेले अनेक परदेशी पर्यटक मुंबई भेटीदरम्यान डॉ. कुमुद कानिटकर यांच्याशी संपर्क साधून मंदिराला भेट देण्याची इच्छा व्यक्त करीत आहेत.
गेल्या काही महिन्यांत अनेक परदेशी पर्यटक येथे येऊन गेले. मात्र भेटीदरम्यान मंदिर परिसरातील दरुगधी पाहून ते आश्चर्य व्यक्त करतात. तसेच मुंबई विद्यापीठात प्राचीन वास्तुशिल्प कलेचा अभ्यास करणारे विद्यार्थीही अंबरनाथचे मंदिर पाहण्यासाठी येतात आणि येथे किमान स्वच्छताही नसल्याबद्दल नाराजी व्यक्त करीत असतात.

पर्यटन विकासाचे मृगजळ
राज्य शासनाने सात वर्षांपूर्वी २००७ मध्ये जाहीर केलेल्या शिवमंदिर परिसर विकास योजनेस लालफीतशाहीची वाळवी लागली. या योजनेसाठी शासनाने २ कोटी १८ लाखांचा निधी जाहीर केला होता. प्रत्यक्षात मात्र एक कोटी ६३ लाख रुपये सार्वजनिक खात्याकडे वर्ग केले. या निधीतून नाल्याचे सुशोभीकरण, उद्यान, वाहनतळ, दुकाने आदी कामांचा समावेश होता. मात्र ही सर्व कामे मंदिरापासून २०० मीटरच्या आत असल्याने केंद्रीय पुरातत्त्व विभागाने नामंजूर केली. त्यामुळे त्या निधीतून सार्वजनिक बांधकाम खात्याने कमान, हायमास्ट, वाहनतळ आणि बगिच्याची कामे केली. मात्र त्यामुळे फारसा पर्यटन विकास साधला गेला नाही.

किमान सांडपाणी तर रोखा
शिलाहारकालीन सर्व मंदिरे पाण्याच्या प्रवाहालगत उभारण्यात आली आहेत. अंबरनाथचे शिवमंदिरही त्यास अपवाद नाही. मात्र सध्या बकाल शहरीकरण आणि औद्योगिकीकरणाने मंदिरालगतच्या जलप्रवाहाचे सांडपाण्याच्या नाल्यात रूपांतर झाले आहे. त्यामुळे पर्यटकांना नाक मुठीत धरूनच मंदिराच्या आवारात प्रवेश करावा लागतो. इतर सुविधांचे राहू द्या, किमान मंदिरालगतचा नाला तातडीने स्वच्छ करणे आवश्यक आहे, असे मत डॉ. कुमुद कानिटकर यांनी ‘वृत्तान्त’शी बोलताना व्यक्त केले. मंदिराचे बाहेरून छायाचित्र काढणाऱ्या पर्यटकांना हटकण्याऐवजी सुरक्षा रक्षकांनी लोकांना नाल्यामध्ये कचरा टाकण्यापासून परावृत्त करावे, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader