शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनात अनेक अविस्मरणीय प्रसंग आले असतील, परंतु त्यापैकी एका थरारक प्रसंगाचे साक्षीदार नागपूर शहर राहिलेले आहे. बाळासाहेबांच्या लढाऊ वृत्तीमुळेच ‘त्या’ दिवशी त्यांचा जीव बचावला, असे नक्कीच म्हणता येईल.
घटना १९६९ सालची आहे. त्या वेळेस नागपूर विद्यापीठ विद्यार्थी संघाचे अध्यक्ष सतीश चतुर्वेदी, तर सचिव विजय जिचकार हे होते. मात्र विद्यार्थी राजकारणात कम्युनिस्टांची दादागिरी चालत होती. त्यामुळेच चार वर्षे त्यांनी विद्यार्थी संघाचा कुठलाच कार्यक्रम होऊ दिला नव्हता. विद्यार्थी संघाकडे ५० हजार रुपये जमा होऊनही त्याचा काही उपयोग होत नव्हता. त्यामुळे रा.स्व. संघाच्या आशीर्वादाने विद्यार्थी संघातर्फे महालातील टाऊन हॉलवर सात दिवसांचे ‘शैक्षणिक संमेलन’ आयोजित करण्यात आले. अभाविपचे शहर सचिव आणि विद्यार्थी संघाचे पदाधिकारी दिलीप देवधर हे संयोजक असलेल्या या संमेलनात देशातील नामवंत २१ लोकांना वक्ते म्हणून बोलावण्यात आले होते. जनसंघाचे अध्यक्ष बलराज मधोक, बापू नाडकर्णी, सी. रामचंद्र, नाना पळशीकर, दत्तो वामन पोतदार, अभाविपचे राष्ट्रीय अध्यक्ष गिरिराज किशोर, ऑर्गनायझरचे संपादक आर.के. मलकानी ही त्यापैकी काही नावे. शिवसेनेच्या स्थापनेला त्यावेळी अवघी तीनच वर्षे झाली होती. या लढाऊ संघटनेचे प्रमुख आणि ‘मार्मिक’चे संपादक बाळ ठाकरे यांनाही कार्यक्रमाचे आमंत्रण देण्यात आले.
कार्यक्रम जाहीर होताच कम्युनिस्टांच्या वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटली. बाळ ठाकरे यांनी नागपुरात जाऊ नये आणि गेल्यास ते जिवंत परत जाणार नाहीत, असा प्रचार महिनाभर सुरू होता. या पाश्र्वभूमीवर संयोजक दिलीप देवधर यांच्यावर प्रचंड दडपण होते. परंतु, संघ नेतृत्वाशी असलेल्या त्यांच्या संबंधांमुळे हा कार्यक्रम पार पाडण्याची जबाबदारी तत्कालीन सरकार्यवाह बाळासाहेब देवरस यांनी घेतली. शिवाय, तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांना आवश्यक त्या सूचना दिल्या.
बाळासाहेब ठाकरे १२ अंगरक्षक सोबत घेऊन रेल्वेगाडीने नागपूरला येणार, असे ठरले होते. बाळ ठाकरेंच्या येण्याचे संभाव्य पडसाद लक्षात घेऊन विद्यार्थी संघाच्या पदाधिकाऱ्यांनी एक योजना आखली. गाडी सकाळी नागपूरला येणार होती, परंतु काहीजण कारने आधीच वध्र्याला गेले आणि रात्रीच तेथे बाळासाहेबांना उतरवून घेतले. हा काफिला कारनेच नागपूरला आला. हे सर्वजण तेव्हाच्या आमदार निवासात, म्हणजे आताच्या ‘सुयोग’ इमारतीत उतरला. ठाकरे यांच्या अंगरक्षकांमध्ये मनोहर जोशी, प्रमोद रागिनवार, सुधीर जोशी, प्रमोद नवलकर यांच्यासह इतरांचा समावेश होता.
दुसऱ्या दिवशी बाळासाहेब ठाकरे महालातील संघ कार्यालयात गेले. तेथे त्यांची त्यावेळचे सरसंघचालक गोळवलकर गुरुजी आणि बाळासाहेब देवरस यांच्याशी भेट झाली. तो दिवस होता ३ जानेवारी १९६९. त्याच सायंकाळी टाऊन हॉलमध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे जाहीर भाषण झाले. बाहेर मैदानावर आणि चौकापर्यंत ध्वनिक्षेपकावरून भाषण ऐकण्यासाठी लोकांनी प्रचंड गर्दी केली होती. भाषणानंतर गर्दीतील संघ स्वयंसेवक आणि कम्युनिस्ट कार्यकर्ते यांच्यात यथेच्छ मारामारी झाली. संघाचे कार्यकर्ते तयारीनिशी हजर असल्यामुळे कम्युनिस्टांना बराच मार खावा लागला.
सभेनंतर बाळासाहेब आमदार निवासात परतले. त्यांचा दुसऱ्या दिवशी मुंबईला परतण्याचा कार्यक्रम होता, जेवणे झाल्यानंतर ठाकरे यांनी दिलीप देवधर यांना सांगितले, की मला रात्रीच्या विमानाने परत जायचे आहे. त्यांनी ही गोष्ट सोबतच्या सर्व अंगरक्षकांनाही सांगितली नाही. त्यावेळेस नागपूरला रात्रीची ‘एअर मेल सव्‍‌र्हिस’ होती. देशाच्या चार महानगरांमधून टपाल घेऊन विमाने नागपुरात येत आणि टपालाची देवाणघेवाण करून परत जात. त्यापैकी मुंबईच्या विमानाने जायचे ठाकरे यांनी निश्चित केले.
बाळ ठाकरे, त्यांचे दोन अंगरक्षक आणि देवधर असे चारजण मोटारीतून विमानतळाकडे निघाले. ठाकरेंच्या हालचालींची खबरबात ठेवून असलेल्या पोलिसांचा प्रचंड ताफा त्यांच्या मागेपुढे होता. वर्धा मार्गावरील ‘अमरप्रेम’ हॉटेल हा कम्युनिस्ट कार्यकर्त्यांचा अड्डा होता. पोलिसांचा ताफा पाहून त्यांना बाळासाहेब ठाकरेंच्या  प्रस्थानाची कल्पना आली. यानंतरचा प्रसंग देवधर यांच्या शब्दांत :
“विमानतळावर पोहचल्यानंतर सफारी सूट घातलेले बाळ ठाकरे आणि मी बुक स्टॉलसमोर बोलत उभे होतो. त्यांचे अंगरक्षक सुमारे १० फुटांवर उभे होते, तर पोलीस विमानतळ इमारतीच्या दारात आणि बाहेर होते. यावेळी दहा-बारा लोकांनी आम्हाला घेरले असल्याचे मला एकदम लक्षात आले. त्यापैकी एकजण ठाकरेंना ‘आपसे बात करना है’, असे म्हणाला. त्यावर ठाकरे यांनी मला ‘हे लोक कोण?’ असे विचारले. प्रसंगाचे गांभीर्य तत्काळ लक्षात येऊन मी सतर्क झालो होतो. ‘तुमच्यावर खास प्रेम करणारी ही मित्रमंडळी आहेत’, असे उत्तर मी त्यांना दिले. बाळासाहेबांना त्यातील इशारा कळला. ‘माझी अपॉइंटमेंट घ्या, आपण जरूर बोलू. आता मला वेळ नाही’, असे ठाकरे यांनी त्या व्यक्तीला सांगितले. त्यावर, ‘आपको बात तो करनी ही पडेगी’, असे तो बाळासाहेबांना म्हणाला.”
“त्या इसमाचे वाक्य पूर्ण होण्याआधीच ठाकरे यांनी सफारीच्या खिशात ठेवलेले रिव्हॉल्वर बाहेर काढले. समोरच्याला काही कळण्याच्या आत त्यांनी त्या मजबूत आणि वजनदार रिव्हॉल्वरच्या दस्त्याचा जोरदार प्रहार करून त्याचे कान आणि थोबाड फोडून टाकले. त्याचे तोंड फुटून रक्ताची चिरकांडी उडाली. त्याबरोबर ‘ठाकरेने मुझे मारा’, असे तो ओरडला. ते ऐकताच बाळासाहेबांचे अंगरक्षक तत्काळ धावले. दोघांनीही पँटच्या शिवणीतून दोन-दोन गुप्त्या बाहेर काढल्या आणि ते १०-१२ लोकांच्या घोळक्यावर तुटून पडले. एका साथीदाराचे सांडलेले रक्त आणि हा हल्ला यामुळे भांबावलेले हे लोक जिवाच्या आकांताने पळाले. दोन्ही अंगरक्षक त्यांच्या मागे धावले. अगदी एका मिनिटाच्या आत ही घटना घडली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरून दोन मिनिटात संपूर्ण हॉल रिकामा झाला.”
“ही नाटय़मय आणि थरारक घडामोड घडल्यानंतर पोलीस धावत आत आले. तेव्हा बाळासाहेबांमधला व्यंगचित्रकार जागा झाला. ‘तुम्ही फिल्मी पोलीस दिसता. सिनेमा संपल्यावर तुमची एंट्री झाली’, असे ते मिष्किलपणे बोलले. मात्र पुढच्याच क्षणी, ‘वसंतराव नाईकांना सांगून तुमची खरडपट्टी काढतो’, असे ते चिडून म्हणाले. नंतर पोलिसांनी त्यांना कडे करून एअरलाईन्सच्या व्यवस्थापकांच्या खोलीत नेले आणि विमानाची वेळ होईपर्यंत तेथेच बसवले”, असे वर्णन करताना या घटनेचे प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या दिलीप देवधर यांच्या डोळ्यांसमोर तो प्रसंग उभा राहिला होता. ‘ठाकरे यांनी त्या लोकांवर हल्ला केला नसता, तर काय झाले असते हे मी सांगू शकत नाही. क्षात्रधर्म म्हणजे काय हे मी त्या दिवशी पाहिले’, असे ते या प्रसंगाबाबत म्हणाले.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जिवावरचा बाका प्रसंग टळला होता. कम्युनिस्टांनी नागपुरात संघाच्या कार्यकर्त्यांकडून तर मार खाल्लाच, शिवाय ठाकरे मुंबईत, म्हणजे त्यांच्या बालेकिल्ल्यात परत गेल्यानंतर शिवसैनिक आणि कम्युनिस्ट यांच्यात मोठय़ा प्रमाणावर संघर्ष झाला. त्यातूनच कृष्णा देसाई या कम्युनिस्ट नेत्याची हत्या झाली. हा सारा इतिहासाचा भाग आहे.
बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनातील एक अविस्मरणीय अध्याय अशारितीने नागपुरात लिहिला गेला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा