अमोल बनला सुहाना, जन्मगावी प्रकटला तेव्हा..
त्याचे ते बाईचे रूप पाहून अख्खे देऊळगांव कुंडपाळ गाव तोंडात बोटे घालू लागले. सगळीकडे आश्चर्य आणि कुतूहलाचे वातावरण निर्माण झाले. गोष्टच काहीशी आगळीवेगळी होती. तब्बल पंधरा वर्षांपूर्वी पोटाची खळगी भरण्यासाठी मुंबईला गेलेला अमोल लिंग परिवर्तनाने चक्क स्त्री होऊन सुहाना नावाने जन्मगावी परतला होता. देऊळगावात त्याला पाहण्यासाठी तोबा गर्दी उसळली. माणसाची ‘बाई’ होण्याचा गावातला पहिलाच बाका प्रसंग होता.
बुलढाणा जिल्हयातील लोणार तालुक्यातील देऊळगाव कुंडपाळ येथील जेमतेम आर्थिक परिस्थिती असलेल्या हरिभाऊ गोविंदराव इंगळे यांचा अमोल हा मुलगा. त्याने प्राथमिक शिक्षण गावात व माध्यमिक शिक्षण लोणारच्या श्री शिवाजी विद्यालयात घेतले. बालपणापासूनच तो बाईसारखा वागायचा. चालणे, बोलणे, हावभाव सर्वकाही स्त्री सारखे! त्यांचा कलही स्त्रीत्वाची मानसिकता जोपासण्याचा होता. गावात व लोणार मध्ये शाळेच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात त्याने स्त्री पात्राच्या हुबेहुब भूमिका वठवल्या!
पंधरा वर्षांपूर्वी कामधंद्याच्या शोधार्थ अमोलने मायानगरी मुंबई गाठली. तेथे त्याचे संबंध मुंबईकर तृतीय पंथीयाशी जुळले. तो हिजडयांच्या संघटनेचा क्रियाशील पदाधिकारी झाला. तृतीय पंथीयांच्या संघटनेच्या मार्फत त्याने दिल्ली गाठली. दिल्ली सर केल्यानंतर अमोलने त्याच्या शरीरावर अवघड शस्त्रक्रिया करून तो संपूर्णपणे हिजडा झाला. यासाठी सहा लाखाचा खर्च आला.
संघटनेने त्याचे अमोल नाव बदलून सुहाना ठेवले. दिल्लीत पैसे मागून तो उदरनिर्वाह करू  लागला. संघटनेने वयोवृध्द किन्नर तृतीय पंथीयांना जगविण्याची जबाबदारी त्याच्यावर टाकली. ती त्याने आनंदाने स्वीकारली. तो मोठया निष्ठेने ती पार पाडत आहे.
असा हा एकेकाळचा अमोल अगदी स्त्री च्या वेषात नटूनथटून जन्मगावी देऊळगांव कुंडपाळ येथे आला. सर्वप्रथम त्याला कोणीही ओळखले नाही. त्याने परिचय करून देताच गावात एकच खळबळ उडाली. सगळे गाव आश्चर्य, कुतूहल व हास्यकलोळात बुडाले. नव्या लोभस स्त्री रूपातील सुहानाला पाहण्यासाठी एकच गर्दी उसळली. लोणारचे ठाणेदार बावस्करही सुहाना ही काय भानगड आहे याची तपासणी करून गेले! प्रश्नांची सरबत्ती आणि बाबा तू माणसाचा बाई कसा झाला याची अमोल उर्फ सुहानाला उत्तरे देता देता नाकीनऊ आले. शेवटी कंटाळून नवरीवाणी नटलेल्या सुहानाने पुन्हा मायानगरी मुंबईकडे धूम ठोकली. अमोलचा हा अफलातून अवतार पाहून त्याच्या आई-बापाच्या डोळयात अश्रू तरळले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा