‘जिस्म’, ‘मर्डर’, ‘राझ’ सारख्या चित्रपटांची निर्मिती करायची, या चित्रपटांना यश मिळते आहे हे पाहून त्याचे सिक्वल्सही काढून झाल्यावर आता उत्तेजक विषयांवरचे चित्रपट माझ्यासाठी इतिहासजमा झाले आहेत, असे उद्गार प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट याने काढले आहेत. करून सरून नामानिराळे होणे म्हणजे काय, याचा प्रत्यय महेश भट्टच्या या विधानावरून यावा. आपण एकविसाव्या शतकातील दुसऱ्या दशकात वावरत आहोत. त्यामुळे हा बदल साहजिक आहे, असे स्पष्टीकरणही त्याने दिले आहे.
हे दशक पुन्हा जुन्याकडे नेणारे असल्याने चित्रपटांच्या बाबतीतही जुने ते सोने असे सध्याचे वातावरण आहे. पुढे जाण्यासाठी एक पाऊल मागे जाणे हीच काळाची गरज आहे, असे हॉलिवूड दिग्दर्शक स्टीव्हन स्पिलबर्गने म्हटले आहे. त्याचे हे विधान आपल्याला पटले असून रिमेक हा आपल्या आगामी चित्रपटांचा फॉम्र्युला असल्याचे महेश भट्टचे म्हणणे आहे. भट्टने दिग्दर्शित केलेल्या १९९० सालच्या ‘आशिकी’ या संगीतमय प्रेमपटाचा रिमेक ‘आशिकी २’ या नावाने प्रदर्शित होतो आहे. ‘आशिकी २’ हा चित्रपट आत्ताच्या आपल्या भडक चित्रपटांपेक्षा अगदी साधा-सरळ आणि स्वच्छ असेल, अशी ग्वाही त्याने दिली आहे.
काळानुसार चित्रपटांचे विषय बदलतात, असे सांगत चार दशकांच्या आपल्या बॉलिवूड कारकीर्दीचा आढावा महेश भट्टने यानिमित्ताने घेतला. सत्तर ते ऐंशीच्या दशकात तत्कालीन सामाजिक परिस्थिीतीची मांडणी करणारे ‘अर्थ’, ‘सारांश’ सारखे चित्रपट मी दिले. त्यानंतर नव्वदच्या दशकात ‘आशिकी’, ‘सडक’, ‘दिल है की मानता नही’ हे चित्रपट तरुणाईला डोळ्यासमोर ठेवून केले होते. एकविसाव्या शतकाच्या उंबरठय़ावर असताना मात्र जागतिकीकरणामुळे संस्कृतीच बदलली.
मल्टिप्लेक्स संस्कृतीत जुने, आडवळणाचे असे काही नको होते. तेव्हाचे विषयच मुळी थेट असल्याने ‘जिस्म’, ‘मर्डर’, ‘राझ’ अशा चित्रपटांची निर्मिती ही गरज होती, असे भट्टने सांगितले. ‘सारांश’सारख्या चित्रपटाने राष्ट्रीय पुरस्कार मिळवून दिला, आंतरराष्ट्रीय स्तरावर ओळखही मिळवून दिली पण, पैसा नाही मिळवून दिला. कुठल्याही चित्रपटाचे अंतिम सत्य हे त्या चित्रपटाने तुम्हाला किती पैसा मिळवून दिला इथेच संपत असेल तर मी एकाच साच्यातील चित्रपट का करू?, असा सवालही त्यांनी केला. आत्ताच्या काळात चित्रपटांचे समीकरण बदलले असून ते लक्षात घेऊनच आपण चित्रपचनिर्मिती-दिग्दर्शन करणार असल्याचे भट्टने सांगितले.
म्हणे, उत्तेजक विषयांवरचे चित्रपट आता इतिहासजमा
‘जिस्म’, ‘मर्डर’, ‘राझ’ सारख्या चित्रपटांची निर्मिती करायची, या चित्रपटांना यश मिळते आहे हे पाहून त्याचे सिक्वल्सही काढून झाल्यावर आता उत्तेजक विषयांवरचे चित्रपट माझ्यासाठी इतिहासजमा झाले आहेत, असे उद्गार प्रसिध्द निर्माता-दिग्दर्शक महेश भट्ट याने काढले आहेत.
First published on: 10-04-2013 at 01:41 IST
मराठीतील सर्व मुंबई वृत्तान्त बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: And saying that cinema on stimulant subject is now history