जायकवाडीवरून जालना शहरासाठी राबविण्यात येणाऱ्या पाणीयोजनेस त्वरित वीजजोडणी द्यावी, या मागणीसाठी सत्ताधारी काँग्रेसचे आमदार कैलास गोरंटय़ाल यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सोमवारी दिवसभर धरणे धरले. विविध संघटनांसोबतच राष्ट्रवादीचे जिल्ह्य़ातील ज्येष्ठ नेते अंकुशराव टोपे, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अरविंद चव्हाण, भाजपा जिल्हाध्यक्ष बबन लोणीकर आदींनी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी उपस्थित राहून पाणीयोजनेस वीजजोड देण्याची मागणी केली.
जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या योजनेची कामे पूर्ण झाली असली, तरी वीजजोड देण्यास जुनी ३६ कोटी रुपये थकबाकी भरण्याची अट वीज कंपनीकडून घातली जात आहे. २१ नोव्हेंबर २०१२च्या मंत्रिमंडळ बैठकीत उस्मानाबादच्या पाणीयोजनेस मात्र वेगळा न्याय देण्यात आला. उस्मानाबादला दिलेल्या ५१ कोटींपैकी दरवर्षी साडेसात कोटी या प्रमाणे दोन वर्षे पाणीयोजनेच्या देखभाल दुरुस्तीस १५ कोटी ठेवण्यात आले. थकीत वीजबिलापोटी २२ कोटींची मान्यता देण्यात आली. जालना व उस्मानाबाद या दोन्ही शहरांच्या योजना ‘यूआयडीएसएसएमटी’ या एकाच कार्यक्रमाखाली असल्या, तरी दोन्ही ठिकाणी वेगवेगळा न्याय सरकारने दिला आहे. जालना शहरातील तीव्र पाणीटंचाई पाहता ही योजना तातडीने कार्यान्वित होण्यासाठी कोणत्याही अटींशिवाय वीजजोडणी देण्याची आवश्यकता असल्याचे निवेदनात म्हटले आहे. या अन्यायाविरुद्ध रास्ता रोको, रेल्वे रोको, मोर्चा तसेच जालना ‘बंद’चा इशाराही देण्यात आला आहे.
राज्याच्या सत्ताधारी आघाडीतील राष्ट्रवादीचे नेते अंकुशराव टोपे यांनी धरणे आंदोलनाच्या ठिकाणी बोलताना सांगितले, की या योजनेसाठी जवळपास १८० कोटींचा निधी सरकारने दिला आहे. त्यामुळे सरकारला धन्यवाद देऊन योजनेसाठी वीजजोडणी देण्याचा आग्रह आपण धरला पाहिजे. यातून मार्ग निघेल, या साठी आपण आशावादी असून त्यासाठी मुंबईस जाणार आहोत. माजी आमदार अरविंद चव्हाण म्हणाले, की शहरात पाणीटंचाई तीव्र असल्याने नवीन योजना त्वरित कार्यान्वित होणे आवश्यक आहे. या योजनेस वीज द्यावी, या साठी आपण उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री अजित पवार यांच्याकडे आग्रही मागणी करणार आहोत.
जालना नगरपालिकेच्या अध्यक्षा पद्मा भरतिया, उपाध्यक्ष राजेश राऊत धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर निकाळजे, भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष दिलीप तौर, समाजवादी पार्टीचे जिल्हाध्यक्ष अॅड. सोहेल सिद्दीकी, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष फिरोजअली मौलाना, मराठवाडा चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष किशोर अग्रवाल, स्वातंत्र्यसैनिक रामेश्वर दायमा, छावाचे देवकर्ण वाघ, राज्य वक्फ मंडळाचे सदस्य जमील मौलाना, समाजवादी पार्टीचे जिल्हा सचिव  अब्दुल रऊफ रजा, आर्य समाजचे अध्यक्ष  पारसनंद, रोटरी क्लब रेन्बो जालनाचे सचिव विनीत खंडेलवाल, मनसेचे जि.प. सदस्य रवींद्र राऊत, मनसेचे शहराध्यक्ष अमोल राऊत, जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. किशोर राऊत, ओमप्रकाश मंत्री (अडतिया असोसिएशन), रमेश तवरावाला (अध्यक्ष, व्यापारी महासंघ), गोवर्धन अग्रवाल (सरचिटणीस, जिल्हा काँग्रेस), फुलचंद भक्कड (माजी नगराध्यक्ष), ब्रिजमोहन लड्डा (मारवाडी संघटना), विमलताई आगलावे (अध्यक्षा, जिल्हा महिला काँग्रेस) यांच्यासह विविध संघटनांचे प्रतिनिधी, व्यक्तींनी आंदोलनास पाठिंबा दर्शवून सहभाग घेतला.
खोतकर यांना मुख्यमंत्र्यांचे आश्वासन
शिवसेनेचे माजी राज्यमंत्री तथा जालना बाजार समितीचे सभापती अर्जुन खोतकर यांनी पाणीयोजनेस वीजजोड देण्याच्या मागणीसाठी मुंबईत मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या वेळी झालेल्या चर्चेनंतर नगरपालिकेच्या थकबाकी भरण्याच्या अंडरटेकिंगवर नवीन योजनेस वीजजोडणी देण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याची माहिती खोतकर यांनी दिली. खोतकर म्हणाले, की जालना शहराची पाणीयोजना नवीन असून उस्मानाबादप्रमाणेच जालना शहरासही न्याय देण्याची मागणी आपण केली. त्यावर उस्मानाबादप्रमाणे जालना शहराची योजना नवीन असल्याची माहिती आपल्यासमोर आली नव्हती, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. जालना नगरपालिकेची ३६ कोटींची वीजबिलाची थकबाकी जुन्या योजनेची असून वीजजोडणीचा प्रश्न नवीन योजनेचा असेल, तर नगरपालिकेकडून थकबाकी भरण्याचे अंडरटेकिंग घेऊन नवीन योजनेस वीज जोडणी देता येईल. या वेळी आपण मुख्यमंत्र्यांना जालना शहरातील सध्याच्या तीव्र पाणीटंचाईबद्दल कल्पना देऊन नवीन योजना तातडीने कार्यान्वित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. या संदर्भात निवेदनही मुख्यमंत्र्यांना दिले. मुख्यमंत्र्यांच्या भेटीच्या वेळी आपल्यासोबत धनराज सांबरे (बदनापूर), प्रदीप जैस्वाल (औरंगाबाद), संजय जाधव (परभणी) हे शिवसेनेचे आमदार उपस्थित होते.

Story img Loader