प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी तलाठी, पटवारी, मंडलाधिकारी समन्वय महासंघाच्या जिल्हा शाखेच्या वतीने जिल्ह्य़ातील सर्व तलाठय़ांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आजपासून दोन दिवसांचे धरणे आंदोलन सुरू केले. फेब्रुवारी ४ ते ६ दरम्यान सामुदायिक रजा आंदोलन व त्यानंतरही दखल घेतली गेली नाही तर ५ मार्चपासून बेमुदत संप सुरू करण्यात येणार आहे.
महासंघाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब निमसे यांनी ही माहिती दिली. सरचिटणीस नानासाहेब वायकर, शेख मंजूरभाई, अप्पासाहेब गुंजाळ, बी. एम. फुलारी, बी. एन. पवार, व्ही. के. जोशी यांच्यासह अनेक तलाठी धरणे आंदोलनात सहभागी झाले होते. निमसे यांनी सांगितले की महासंघ पदाधिकाऱ्यांच्या सरकारबरोबर अनेक वेळा बैठका झाल्या, चर्चा झाली, आश्वासने मिळाली, मात्र त्यातील एकाचीही अंमलबजावणी झाली नाही. वर्षांनुवर्षे तलाठी, पटवारी संवर्गाच्या मागण्या प्रलंबित आहेत.
तलाठी सज्जांची पुनर्रचना करावी, गावस्तरावर तलाठय़ाला प्रशासन प्रमुख म्हणून दर्जा द्यावा, नायब तहसीलदार पदावर पदोन्नतीसाठीचा कोटा वाढवावा, रिक्त पदे त्वरित भरावीत, संगणक द्यावेत, खात्यांतर्गत होणाऱ्या विविध परिक्षांना बसण्याची परवानगी असावी, प्रवास भत्ता मंजूर करावा अशा अनेक मागण्यांना सरकार कायम वाटाण्याच्या अक्षता लावत आहे. त्यामुळेच महासंघाने आता आंदोलनाचा निर्णय घेतला असून त्याचा पहिला टप्पा म्हणून दोन दिवसांचे धरणे आंदोलन राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर धरण्यात आले आहे, असे निमसे यांनी सांगितले. त्यानंतर सामुदायिक
रजा व नंतर बेमुदत संप
करण्यात येणार आहे, अशी
माहिती त्यांनी दिली.

Story img Loader