राज्य परिवहन मंडळातील निवृत्त कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी नाशिक विभाग राज्य परिवहन निवृत्त कर्मचारी संघटनेच्यावतीने विभागीय कार्यालयासमोर धरणे धरण्यात आले.
संघटनेचे अध्यक्ष अशोक रांगणेकर, कार्याध्यक्ष परमानंद कोठावळे व सुधाकर गुजराथी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले. निवृत्त कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून संघटना दोन वर्षांपासून ते सोडविण्यासाठी पाठपुरावा करीत आहे. परंतु, विभागीय प्रशासन हेतुपुरस्सर टाळाटाळ व दिरंगाई करून दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहे. महामंडळाने योग्य ती कागदपत्रे व  वर्गणीचा भरणा न केल्यामुळे निवृत्त कामगारांचे निवृत्ती वेतन सुरू होऊ शकले नाही.
काही कामगारांना कमी प्रमाणात निवृत्ती वेतन मिळते. सेवा पुस्तिका मिळत नसल्याने ५० निवृत्त कामगारांची हक्काची थकबाकीची रक्कम दोन वर्षांपासून मिळालेली नाही. निवृत्तधारकांच्या विधवांना सवलतीचा पास नाकारणे, अशा जवळपास २५ प्रश्नांकडे संघटनेने लक्ष वेधले आहे. आपल्या मागण्यांचे निवेदन विभागीय नियंत्रकांना देण्यात आले. आंदोलनात पदाधिकाऱ्यांसह अनंत भालेराव, राजाभाऊ जाधव, कृष्णा शिरसाठ, शामराव गाढे आदी कर्मचारी सहभागी झाले होते.