मागील वर्षीच्या दुष्काळी परिस्थितीतून शेतकरी आता कुठे सावरत असून विहिरींची पाण्याची पातळी हळूहळू वाढत येत आहे. अशा परिस्थितीत वीज वितरण कंपनी थकीत वीज देयकांसाठी बंद पडलेली जनित्रे सुरू करण्याकरिता टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आ. प्रा. शरद पाटील यांनी केला आहे. कृषी वीज पंपांसाठी दिवसा विद्युत पुरवठा गरजेचा असताना जाणीवपूर्वक रात्री वीजपुरवठा केला जात आहे. दिवसाचे भारनियमन कमी करून कांदा लागवडीसाठी दिवसा वीजपुरवठा करावा, नोव्हेंबरमध्ये पिकांची काढणी होईपर्यंत सक्तीची वसुली करू नये, अन्यथा आंदोलन छेडावे लागेल, असा इशाराही आ. पाटील यांनी दिला आहे.
रिमझिम पावसामुळे पिकांची स्थिती सध्या उत्तम आहे. गेल्या दोन हंगामापासून शेतकरी दुष्काळाला तोंड देत असताना यंदा पावसाने चांगली सुरवात केल्यामुळे आशादायी हंगाम दिसत आहे. मात्र अतिपावसामुळे ओल्या दुष्काळाचेही संकट उभे राहण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. वीज वितरण कंपनी थकीत वीज देयकांसाठी सध्या तगादा लावत असून नादुरूस्त जनित्रे बदलून देण्यास टाळाटाळ करीत आहे. तसेच जाणीवपूर्वक कृषी पंपांसाठी दिवसाच्या भारनियमनात वाढ केली असून ग्रामीण भागातील घरगुती ग्राहकांसाठी रात्रीच्या भारनियमनात वाढ केली आहे. यामुळे शेतकऱ्यांसह सर्वजण त्रस्त झाले आहेत.
गेल्या आठवडाभरापासून आमदार कार्यालयात शेतकऱ्यांच्या मोठय़ा प्रमाणात तक्रारी येत असून वीज वितरण कंपनी शेतकऱ्यांशी सापत्न भावनेने वागत आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांच्या मनात वीज वितरण कंपनीच्या प्रशासनाविषयी नाराजी वाढली आहे. विविध विभागातील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवर चर्चा व विनंती करूनही दिवसाचे भारनियमन कमी करण्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद देण्यात आलेला नाही. तसेच वीज देयक स्वीकारताना एवढीच रक्कम भरा अशी अट घालून जनित्रे देण्यास टाळाटाळ केली जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये या अधिकाऱ्यांविषयी संतापाची भावना निर्माण होत असल्याचेही आमदारांनी निदर्शनास आणून दिले.
धुळे हा शेतकरी आत्महत्याग्रस्त तालुका असल्याची जाणीवही आमदारांनी विद्युत अधिकाऱ्यांना करून दिली. दोन हंगामापासून टंचाई असल्याने येत्या नोव्हेंबपर्यंत शेतकऱ्यांकडे शेतीमाल विकल्याशिवाय पैसा येणार नाही. त्यामुळे वितरण कंपनीने स्वत:हून अशा प्रकारचे जाचक निर्णय मागे घ्यावेत आणि दिवाळीपर्यंत शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी आ. पाटील यांनी केली आहे. या मागणीचा विचार न केल्यास आणि वीज वितरण कंपनीचे आडमुठे धोरण यापुढेही सुरू राहिल्यास शिवसेनेला आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा आ. पाटील यांनी शिवसेनेच्या वतीने दिला आहे.  

Story img Loader