जिल्ह्यातून बेपत्ता झालेल्या १०२ अल्पवयीन मुलींचा शोध घ्यावा आणि धुळे तालुक्यातील नगाव शिवारात उघडकीस आलेल्या अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराची सखोल चौकशी करावी, या प्रकरणात प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे सहभाग असणाऱ्यांना अटक करावी, या मागण्यांसाठी बुधवारी येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात विविध पक्ष, संघटना सहभागी होणार आहेत.
लोकसंघर्ष मोर्चाच्या नेत्या प्रतिभा शिंदे यांनी केलेल्या आवाहनानुसार माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, आ. शरद पाटील, श्रावण शिंदे, एल. आर. राव, रणजित परदेशी, प्राची कुलकर्णी, जयश्री अहिरराव, ज्योत्स्ना मुंदडा, ज्योती पावरा आदी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय कम्युनिष्ट पक्ष, मनसे, काँग्रेस या पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहभागामुळे प्रशासनाला मागण्यांची दखल घ्यावी लागेल, असा आंदोलनकर्त्यांना विश्वास आहे. नाशिक येथील अल्पवयीन मुलीला पळवून आणत धुळे शिवारातील नगाव येथे बेबीताई चौधरी यांच्या निवासस्थानी त्या मुलीकडून देहविक्रीचा व्यवसाय करवून घेण्यात येत होता, असा आरोप आहे. २९ जानेवारी २०१३ रोजी उघडकीस आलेल्या या घटनेनंतर गंभीर स्वरूपाचा गुन्हा नोंदवून पत्रकार विजय टाटिया, किशोर बाफना, गणेश चौधरी व बेबीताई चौधरी यांना अटकही करण्यात आली. या प्रकरणात सक्रिय असलेला मुंबईतील हसन नामक दलाल अद्याप ताब्यात येऊ शकलेला नाही. धुळ्यासह परिसरातील प्रतिष्ठितांचाही या प्रकरणात सहभाग असल्याचा संशय असून त्याची सखोल चौकशी केल्यास सत्य बाहेर येईल, असे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा