मोटार वाहन कायद्याचा भंग करून मन मानेल अशा पद्धतीने भाडे उकळणाऱ्या आणि मीटर डाऊन करण्यास नकार देणाऱ्या मुजोर रिक्षाचालकांपुढे कल्याण-डोंबिवलीतील रिक्षाचालक-मालक संघटनांचे नेते आणि सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी यांनी नांगी टाकली आहे. आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांनी रस्त्यावर उतरून काही दिवस मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात धडक मोहीम राबवावी, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दीड ते दोन वर्षांपासून कल्याण-डोंबिवलीतील प्रवासी संघटना आणि वृत्तपत्रांनी मीटर सक्तीचा विषय लावून धरला आहे. आता तर बहुतांश रिक्षांना नवीन इलेक्ट्रॉनिक मीटरही बसविण्यात आले आहेत. त्यामुळे मीटर न टाकण्यासाठी आता रिक्षाचालकांसमोर कोणतीही सबब राहिलेली नाही, तरीही मुजोर रिक्षाचालक प्रवाशांनी सांगितल्यानंतरही मीटर डाऊन करत नाहीत. याचा अर्थ रिक्षा संघटनांचे नेते, सर्वपक्षीय लोकप्रतिनिधी, आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांचा या रिक्षाचालकांवर अजिबात वचक नाही किंवा यामागे काहीतरी वेगळे ‘अर्थ’कारण असावे, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.
रिक्षा संघटनांचे नेते आम्ही मीटर डाऊन करण्याच्या बाजूचे आहोत, असे जाहीरपणे सांगत असले, तरी मीटरसक्ती लागू करण्याबाबत एकही रिक्षा संघटना आग्रही आहे, त्यांनी रिक्षाचालकांना आवाहन करणारे फलक रिक्षातळावर लावले आहेत, असे चित्र अद्याप पाहायला मिळालेले नाही. राजकीय पक्ष आणि त्यांच्या नेत्यांना याची काहीच पडलेली नाही. डोंबिवलीतील ‘जाणता राजा’ जाहिरात फलकावरून प्रवाशांच्या या रास्त मागणीसाठी रस्त्यावर कधी उतरणार, याची डोंबिवलीकर नागरिक वाट पाहात आहेत.
४० रुपयांच्या ठिकाणी
मीटरनुसार झाले फक्त २४ रुपये
डोंबिवली येथील आरती दांडेकर यांना सावित्रीबाई फुले नाटय़गृह येथे जायचे होते. त्यांनी ठाकूर हॉल, डोंबिवली (पूर्व) येथे रिक्षा पकडली. रिक्षाचालकाने ४० रुपये होतील म्हणून सांगितले. दांडेकर यांनी रिक्षाचालकाकडे मीटर डाऊन करण्याचा आग्रह धरला. कटकट करत तो रिक्षावाला तयार झाला. ज्या प्रवासासाठी रिक्षाचालक ४० रुपये मागत होता, तोच प्रवास मीटर डाऊन केल्यामुळे अवघ्या २४ रुपयांत झाला.
आरटीओ आणि वाहतूक पोलिसांची हवी धडक कारवाई
कल्याण-डोंबिवलीतील मुजोर रिक्षाचालकांची मुजोरी मोडून काढण्यासाठी आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांनी धडक कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उतरावे, अशी अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक आरटीओ आणि वाहतूक पोलीस यांच्याकडे या कारवाईसाठी आवश्यक ते मनुष्यबळ नसेल, तर त्यांच्या वरिष्ठांनी याची दखल घेऊन मुंबई किंवा ठाण्यातून कर्मचारी/अधिकारी येथे पाठवावेत. काही दिवस मुजोर रिक्षाचालकांच्या विरोधात धडक मोहीम राबवली, तर कदाचित रिक्षाचालकांना मीटर डाऊन करण्याची सवय होईल, असे प्रवाशांचे म्हणणे आहे.